महाराष्ट्र टाइम्स
२२ मार्च २०१२
पुणे भारत
यशवंत चौघुले यांची निर्मिती किडनी मिळवण्याची प्रक्रिया किंवा 'किडनी स्वॅपिंग'ची प्रक्रिया व तिची नियमावली खूप गुंतागुंतीची असल्याने अनेक रुग्णांना जीव गमवावा लागतो. याच पार्श्वभूमीवर किडनी मिळविण्याबाबतच्या प्रक्रियेची सर्वांना माहिती होण्यासाठी जहांगिर हॉस्पिटलमधील एक सत्यकथा, निर्माते यशवंत चौघुले यांनी 'स्वॅप' या शॉर्ट फिल्ममधून मांडली आहे. विशेष म्हणजे, ही शॉर्ट फिल्म त्यांनी सर्वांसाठी मोफत उपलब्ध केली आहे.
किडनी मिळवण्यासाठी नोंदणी करावी लागते याविषयी अनेकांना माहिती नाही. 'किडनी स्वॅपिंग' करण्यासाठी रुग्णांचे 'ब्लड रिलेशन' असणे आवश्यक आहे, असे काही गंुतागुंतीचे नियम आहेत. ही सगळी प्रक्रिया पूर्ण होण्यासाठी बराच काळ लागतो. या प्रक्रियेविषयीची माहिती या शॉर्ट फिल्ममधून देण्याचा प्रयत्न करण्यात आला असून अमोल भावे यांनी त्याचे दिग्दर्शन केले आहे.
सध्याच्या गंभीर सामाजिक विषयावर आधारित असलेल्या या शॉर्टफिल्मविषयी अधिक जाणून घेण्यासाठी 'मटा'ने चौघुले यांच्याशी संवाद साधला असता, ते म्हणाले, 'जहांगीर हॉस्पिटलमध्ये घडलेली 'किडनी स्वॅपिंग'ची एका घटना वर्तमानपत्रातून वाचनात आली होती. त्याच वेळी त्याचे गांभीर्य लक्षात आल्याने सामाजिक बांधिलकीतून या विषयावर शॉर्ट फिल्म करावी असा विचार मनात आला. या गुंतागुंतीचे नियम रुग्णांची गरज लक्षात घेऊन, काही प्रमाणात शिथिल व्हावेत असे वाटते. तसेच 'ब्रेन डेड' झालेल्या रुग्णांच्या नातेवाइकांनी त्या रुग्णांच्या किडन्या वेळीच दान केल्यास गरजू रुग्णांचे जीव वाचू शकतात. ही किडनी दान करण्याची मानसिकता तयार होणे आवश्यक आहे, अशा प्रकारचे भाष्य या फिल्ममधून केले आहे.'
या प्रक्रियेबाबतची जागरूकता निर्माण व्हावी या हेतूने क्षितिज मूव्हीज इंटरनॅशनलच्या माध्यमातून चौघुले यांनी ही फिल्म सर्वांसाठी मोफत उपलब्ध केली आहे. इच्छुकांनी ही फिल्म मिळविण्यासाठी आपले नाव आणि संपूर्ण पत्ता ९८१९५५८८४६ आणि ९९७०१८५७०३ या क्रमांकावर एसएमएस करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.