सकाळ
२० जुलै २०१२
पुणे– इंटरनॅशनल आयुर्वेद असोसिएशनच्या वतीने आंतरराष्ट्रीय चरक संहिता दिवसानिमित्त रविवारी (22 जुलै रोजी) आयुर्वेदामध्ये महत्त्वपूर्ण असलेल्या "बृहदत्रयी' संहितांना समर्पित आंतरराष्ट्रीय परिषद घेण्यात येणार आहे. या परिषदेमध्ये नऊ देशांचे प्रतिनिधी सहभागी होणार आहेत.
सेनापती बापट रस्त्यावरील मराठा चेंबर ऑफ कॉमर्सच्या सभागृहामध्ये सकाळी नऊ ते सायंकाळी पाच या वेळेत ही परिषद होणार आहे. संघटनेचे संस्थापक डॉ. पां. ह. कुलकर्णी, डॉ. शिवराम किरुमक्की व डॉ. रेखा जैन यांची प्रमुख उपस्थिती असेल, अशी माहिती संघटनेचे डॉ. अतुल राक्षे यांनी पत्रकार परिषदेत दिली. या वेळी डॉ. कौस्तुभ घोडके–वेदपाठक उपस्थित होते.
डॉ. राक्षे म्हणाले, "आयुर्वेदातील संशोधनात्मक कार्यास प्रोत्साहन देणाऱ्या या परिषदेमध्ये आयुर्वेदातील तज्ज्ञ संशोधनात्मक प्रबंध सादर करणार आहेत. तसेच या वेळी आयुर्वेद क्षेत्रात काम करणाऱ्या विविध व्यक्तींना धन्वंतरी पुरस्कार, आयुर्वेद भूषण पुरस्कार व चरक संहिता जीवनगौरव पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे."