सकाळ .
१२ जुलै २०१२
पुणे– समाजातील विशेष मुलांबद्दल काहींना अप्रूप वाटते, तर काही जण सहानुभूती व्यक्त करतात. मात्र, त्यापुढे जाऊन विशेष काही करण्याबद्दल चर्चा होत नाही. स्पीच थेरपिस्ट अलकाताई हुदलीकर यांनी ती कमाल करून दाखविली आहे. मूक–बधिर मुलांना सामान्य मुलांसारखे शिक्षण व योग्य मार्गदर्शन मिळाले, तर अशी मुलेही उत्कृष्ट बोलू शकतात, असे अलकाताईंनी "सकाळ'शी बोलताना सांगितले. आजपर्यंत शेकडो मुलांना त्यांनी "आवाज' दिला असून, त्यांचे विद्यार्थी आज मोठ्या पदावर कार्यरत आहेत.
पंच्याहत्तर वर्षीय अलकाताई प्रभात रस्त्यावर गेल्या चाळीस वर्षांपासून मूक–बधिर मुलांवर स्पीच थेरपीचा प्रयोग करतात. त्या म्हणाल्या, " "तंत्रज्ञानाच्या प्रगतीमुळे मुलं मूक–बधिर असल्याची कल्पना पहिल्या एक–दीड महिन्यातच पालकांना येते. अशा मुलांसाठी वेगवेगळी श्रवणयंत्रे बाजारात उपलब्ध आहेत. त्यांच्या कानांपर्यंत भोवतालचे आवाज नेण्याचे काम हे यंत्र करत असते. मात्र, त्यांना योग्य पद्धतीने भाषा शिकवण्याची गरज असते. मुलांच्या कानावर शब्द पडणे गरजेचे असते. "
त्या म्हणाल्या, "उपचारांत विलंब झाल्यास त्या मुलांना अनेकदा बोलते करण्यात फार मोठी समस्या निर्माण होते. अन्य सर्वसामान्य मुलांना जसं शिकवावे तसंच त्यांनाही शिकवण्यावर भर द्यावा. या मुलांना आठवड्यातून मी केवळ एकदाच शिकवते. मुलांसोबत नेहमी पालकच असतात. त्यामुळे पालकांनाच योग्य प्रशिक्षण दिलं तर त्याचा मुलांना मोठा फायदा होतो. यामुळे अनेक मुलं आज बोलायला व ऐकायला लागली आहेत. "
निनाद यन्नुवार, रोहन कुलकर्णी व प्रिया क्षीरसागर यांच्यासह अनेक जण वयाच्या दुसऱ्या वर्षापासून अलकाताईंकडे येत आहेत. सर्व जण स्पीच थेरपीनंतर उत्कृष्टपणे बोलतात. निनाद व रोहनने अभियांत्रिकीच्या परीक्षा दिल्या आहेत, तर प्रियाने बेकरी व्यवसाय सुरू केला आहे. विशेष म्हणजे त्यांनी सामान्य मुलांच्या शाळेतच शिक्षण घेतले आहे. रोहनने विविध विषयांमध्ये सुवर्णपदके मिळविली आहेत.
शुभदा जोशी या आपल्या आठ वर्षे वयाच्या तनिष्कला गेल्या सहा महिन्यांपासून अलकाताईंकडे घेऊन येत आहेत. या काळात तनिष्कच्या उच्चारांमध्ये मोठा फरक पडल्याचे त्यांनी सांगितले. रोहनची आई दीपा कुलकर्णी या तर गेल्या 19 वर्षांपासून येत आहेत. अलकाताईंची शिकवण्याची पद्धतच वेगळी असल्याचे त्यांनी सांगितले. त्याचबरोबर मूक–बधिर मुलांना सामान्य शाळांनी शिक्षणाची संधी द्यावी, अशी भावना राजश्री झिरपे या मातेने व्यक्त केली.
"अलकाताईंच्या थेरपीचा फरक पडतो. मुले बोलायला लागतात. त्यामुळे जो आनंद होतो, तो शब्दांत सांगता येणे शक्य नाही, " असे शुभदा जोशी, दीपा कुलकर्णी, राजश्री झिरपे या पालकांनी सांगितले.
अशी घ्या काळजी
- योग्य उपचारांबरोबरच मार्गदर्शकांचा सल्ला घ्या
- हातवारे करून मुलांशी बोलू नका
- जास्तीत जास्त शब्द मुलांच्या कानांवर पडू द्या
- सर्वसामान्य मुलांप्रमाणेच त्यांच्याशी वागा
- उपकरणांबाबत योग्य माहिती करून घ्या.