ई सकाळ
२९ सप्टेंबर २०११
मुंबई भारत
धावती जीवनशैली आणि वाढते ताणतणाव यामुळे हृदयरोगाचा धोका मोठ्या प्रमाणावर वाढला आहे. "जागतिक हृदय दिना'निमित्त मुंबईतील "मेट्रोपोलिस हेल्थकेअर' या संस्थेने केलेल्या पाहणीत पुरुषांपेक्षा स्त्रियांमध्ये हृदयरोगाची समस्या वाढत असल्याचे दिसून आले.
बदलत्या जीवनशैलीचा ताण हृदयावर पडत असून या समस्येने गंभीर स्वरूप धारण केले आहे. उद्या (ता. 29) "जागतिक हृदय दिन (वर्ल्ड हार्ट डे) आहे. त्यानिमित्त मेट्रोपोलिस हेल्थकेअरतर्फे मुंबईतील 25 ते 45 वर्षे वयोगटातील व्यक्तींची पाहणी करण्यात आली. रक्तातील कोलेस्टरॉल आणि ट्रायग्लिसराईड्स या घटकांच्या वाढत्या प्रमाणामुळे पुरुषांपेक्षा स्त्रियांमध्ये हृदयरोगाचा धोका वाढल्याचे दिसून आले. या पाहणीत शहरातील 92 हजार नागरिकांच्या कोलेस्टरॉल, ट्रायग्लिसराईड्सची पातळी, एचडीएल आदी चाचण्या करण्यात आल्या. त्यामध्ये सुमारे 32 हजार "पॉझिटिव्ह' आणि 60 हजार "निगेटिव्ह' नमुने आढळले. या चाचण्यांच्या अहवालांवरून 3368 पुरुष आणि 5172 स्त्रियांमध्ये कोलेस्टरॉलची पातळी सरासरीपेक्षा अधिक असल्याचे निष्पन्न झाले.
ऍथेरोस्क्लेरॉसिस आणि कॉरोनरी स्वरूपाच्या हृदयविकाराचे प्रमाण 25 ते 45 वयोगटातील व्यक्तींमध्ये अधिक आढळत असल्याचे मेट्रोपोलिस हेल्थकेअरच्या स्पेशल इम्युनोकेमिस्ट्री विभागाचे प्रमुख डॉ. राजेश बेंद्रे यांनी सांगितले. नियमित तपासणी आणि आवश्यक ती काळजी घेतल्यास या वाढत्या समस्येवर नियंत्रण ठेवता येईल. जीवनशैली बदलत असली तरीही वजनावर नियंत्रण आणि नियमित व्यायाम या दोन बाबी हृदय कार्यक्षम ठेवण्यासाठी खूप महत्त्वाच्या ठरतात. त्यासाठी "रेड मीट' खाणे शक्यतो टाळून आहारात माशांचा समावेश करावा, ताजी फळे आणि भाज्यांवर भर द्यावा, साखरेचे प्रमाण कमी करावे. "फायबर'चे (तंतू) प्रमाण अधिक आणि कमीत कमी कॅलरी असलेले पदार्थ आहारात समाविष्ट करावेत; त्यामुळे हृदयरोगावर निश्चितच नियंत्रण मिळवता येईल, असे आहारतज्ज्ञ नमिता नानल म्हणतात.
स्त्रियांमध्ये हृदयरोगाच्या धोक्यात वाढ
- Details
- Hits: 3276
0