Print
Hits: 2823

सकाळ वृत्तसेवा
०२ मार्च २०११
पुणे, भारत

मानवी आरोग्यास घातक ठरू शकणाऱ्या सहा औषधांवर बंदी घालण्यात आली असून, ती औषधे बाजारातून परत घेण्याचा आदेश देण्यात आला आहे. यात लहान मुलांना तापावर वापरण्यात येणारी, ऍसिडीटीसाठीची आणि वजन कमी करण्यासाठी घेण्यात येणाऱ्या काही औषधांचा समावेश आहे. केंद्र सरकारचा हा बंदी आदेश राजपत्रात प्रसिद्ध करण्यात आला आहे. त्या आधारे राज्याच्या अन्न व औषध प्रशासनाने राज्यातील सर्व कार्यालयांना याची अंमलबजावणी करण्याचा आदेश दिला आहे. निम्सुलाईड व त्याचे मिश्रण असलेल्या सर्व औषधांचा बारा वर्षांखालील मुलांसाठी वापर करण्यावर बंदी घालण्यात आली आहे. तापासाठी हे औषध वापरले जाते. मोठ्या व्यक्तींसाठी मात्र हे औषध वापरता येणार असून औषधाच्या बाटलीवर "बारा वर्षांखालील मुलांसाठी नाही' अशी स्पष्ट सूचना छापण्यास सांगण्यात आले आहे. आम्लपित्तासाठी वापरले जाणारे, सीसाप्राइड, सर्दी-खोकल्यासाठीचे फेनाइलप्रोपॅनोलामाईन, ह्यूमन प्लासेंटल एक्‍स्ट्रॅक्‍ट, लठ्ठपणा कमी करण्याच्या औषधातील सिबुटरामाईन व आर. सिबुटरामाईन या औषधी द्रव्यांवर बंदी घालण्यात आली आहे. ही औषधे व ती इतरांसोबत मिसळून करण्यात येणारी औषधे यावर बंदी घालण्यात आली आहे.

अन्न व औषध प्रशासनाने राज्यातील सर्व औषध दुकानांतून या औषधांची विक्री तत्काळ थांबविण्याचे व उपलब्ध साठा उत्पादकांकडे परत पाठविण्याचे आदेश दिले आहेत. यासाठी जिल्हा केमिस्ट संघटनांच्या बैठका घेऊन याची माहिती देण्यात येत आहे. यासंबंधीची कार्यवाही पूर्ण करून 14 मार्चला अहवाल सादर करण्यास सांगण्यात आले आहे. पुण्यातील अन्न व औषध प्रशासनाने यानुसार कार्यवाही सुरू केली आहे. सहआयुक्त रवींद्र जोशी यांनी ही माहिती दिली.

Disclaimer: The news story on this page is the copyright of the cited publication. This has been reproduced here for visitors to review, comment on and discuss. This is in keeping with the principle of ‘Fair dealing’ or ‘Fair use’. Visitors may click on the publication name, in the news story, to visit the original article as it appears on the publication’s website.