सकाळ वृत्तसेवा
१३ ऑक्टोबर २०११
पुणे, भारत
अंधत्व नियंत्रणाच्या उपाययोजनांना समाधानकारक यश मिळत असतानाच, आता गुणवत्ता सुधारण्याकडे लक्ष देण्यात येणार आहे. त्याचे निकष निश्चित करण्याचे काम राष्ट्रीय पातळीवर सुरू करण्यात आले आहे,'' अशी माहिती "व्हीजन 2020'चे अध्यक्ष कर्नल डॉ. मदन देशपांडे यांनी दिली.
जागतिक आरोग्य संघटना, जागतिक अंधत्व निर्मूलन संस्था यांच्यातर्फे दर वर्षी ऑक्टोबरमधील दुसरा गुरुवार "जागतिक दृष्टी दिन' म्हणून साजरा करण्यात येतो. 2004 पासून हा दिन साजरा होत आहे. 2020 पर्यंत देशातील अंधत्व निर्मूलन करण्याचा उद्देश निश्चित करून "व्हीजन 2020' स्थापन करण्यात आली आहे. त्याची परिषद उद्या (ता. 13) राजस्थानातील उदयपूर येथे होत आहे. त्याच्या पूर्वसंध्येला डॉ. देशपांडे यांनी "सकाळ'शी संवाद साधला.
ते म्हणाले, ""देशातील 80 टक्के अंधत्व विनाकारण येते; तर उर्वरित 20 टक्के अंधत्व कायमस्वरूपी असते. 80 टक्के अंधत्व कमी करण्यासाठी स्वयंसेवी संस्था, सरकारी आणि खासगी रुग्णालये जोरदार प्रयत्न करीत आहेत. मोतीबिंदूमुळे अंधत्व येण्याचे प्रमाण आतापर्यंत 80 टक्के होते. ते आता 62 टक्क्यांपर्यंत कमी झाले आहे; पण मधुमेही रुग्णांच्या डोळ्यांवर होणाऱ्या परिणामाचे (डायबेटिक रेटिनोपॅथी) प्रमाण झपाट्याने वाढत आहे. काचबिंदू, लहान मुलांचे डोळ्यांचे विकार अशा कारणांमुळे येणारे अंधत्वही वाढत आहे. त्याला नियंत्रित करण्यासाठी जनजागृतीचा उपक्रम हाती घेण्यात आला आहे.''
अंधत्व नियंत्रणाच्या शस्त्रक्रियांची संख्या समाधानकारक आहे; पण त्यातील गुणवत्ता ही आता महत्त्वाचा टप्पा आहे. त्यामुळे त्याची गुणवत्ता ठरविण्यासाठी निकष निश्चित करण्यात येत आहेत, असेही त्यांनी सांगितले.
नेत्रदानाचे प्रमाण वाढले पाहिजे
अंधांना नव्याने दृष्टी देण्यासाठी नेत्रदानाचे प्रमाण वाढले पाहिजे. भारतात दर वर्षी तीन लाख जणांना जग पाहण्यासाठी नेत्रदानाची गरज असते. प्रत्यक्षात मात्र 38 हजार नेत्र जमा होतात. त्यामुळे नेत्रदानाबाबत समाजात जागृती करण्यात येत असल्याचे कर्नल डॉ. देशपांडे यांनी स्पष्ट केले.
शस्त्रक्रियांच्या गुणवत्तेला आता नवीन "दृष्टी'
- Details
- Hits: 3052
0