ई सकाळ
१४ नोव्हेंबर २०११
मुंबई भारत
मधुमेहामुळे मूत्रपिंडांवर होणारा दुष्पपरिणाम सर्वांनाच ठाऊक आहे. मात्र धक्कादायक बाब म्हणजे, अनियंत्रित रक्तशर्करेमुळे आता तिशीच्या आतील तरुणांची किडनी निकामी होण्याचे प्रमाण वेगाने वाढते आहे. सुमारे 40 टक्के मुंबईकर मधुमेहग्रस्त असून याच कारणामुळे किडनी निकामी होणाऱ्या तरुणांचे प्रमाण 10 ते 12 टक्के आहे. धूम्रपान, "फास्ट फूड', झोपेच्या अनियमित वेळा, झोपेच्या गोळ्यांचे सेवन या साऱ्यांचा एकत्रित दुष्परिणाम मूत्रपिंडांवर होत असल्याचे "मुंबई किडनी फाऊंडेशन'ने केलेल्या सर्वेक्षणात निष्पन्न झाले आहे.
मधुमेहामुळेमूत्रपिंडे निकामी होण्याचे प्रमाण 22 ते 30 वर्षे वयोगटात 7 ते 10 टक्के असल्याचे सांगण्यात आले. "टाईप वन' मधुमेहाच्या रुग्णांत मुख्यत्वे 20 ते 30 वयोगटातील, तर "टाईप टू'मध्ये तिशीच्या पुढील व्यक्तींचा समावेश असतो. पहिल्या गटातील व्यक्तींनी मधुमेह आटोक्यात ठेवण्यासाठी लागणाऱ्या औषधोपचारांचे तसेच पथ्यांचे पालन केले नाही, तर अल्पावधीत त्यांचा दुसऱ्या गटात समावेश होतो.
देशात 166 किडनी उपचार केंद्रे आहेत. तेथील 45 हजार 885 प्रकरणांपैकी 29 हजारांहून अधिक जणांना मधुमेहामुळे मूत्रपिंडांचे विकार जडले आहेत. लठ्ठपणा, एकाच ठिकाणी बसून काम करणे; तसेच प्रतिजैविकांच्या अतिरिक्त सेवनाचा मूत्रपिंडांच्या कार्यक्षमतेवर दुष्परिणाम होतो.
आधुनिक जीवनशैलीमुळे रक्तशर्करेचे प्रमाण नियंत्रणाबाहेर जाते. अनेकदा त्याकडे वेळीच लक्षही दिले जात नाही. मुंबई किडनी फाऊंडेशनचे अध्यक्ष डॉ. उमेश खन्ना यांनी दिलेल्या माहितीनुसार, यापूर्वी मधुमेहामुळे किडनीशी संबंधित विविध व्याधींशी सामना कसा करावा याबाबत कार्यक्रम आखले जात होते. मात्र मागील पाच वर्षांपासून हे चित्र पूर्णपणे बदलत चालले आहे. "श्रीमंत व्याधी' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या किडनीविकारांमध्ये शहरी भागातील मध्यमवर्गीय तरुण मोठ्या प्रमाणात अडकला आहे. "नॅशनल सीकेडी रजिस्ट्री'ने दिलेल्या माहितीनुसार पुढील पाच वर्षांत हे प्रमाण पाच टक्क्यांनी वाढण्याची शक्यता आहे.