ई सकाळ
११ नोव्हेंबर २०११
पुणे भारत
सोप्या पद्धतीची योगासने करून सामान्य माणसालाही निरामय आरोग्याचा लाभ घेता येते, असा संदेश ज्येष्ठ योगाचार्य बी. के. एस. अय्यंगार यांनी दिला. त्यांच्या शिष्यांनी योगासनाची प्रात्यक्षिके सादर केली. मूत्रपिंड, हृदय अशा अवयवांच्या प्रत्येक पेशीला पूर्ण क्षमतेचे कार्य करण्याची ऊर्जा यातून मिळतेच. मानसिक ताणतणाव दूर करण्यासाठी योगासने हा प्रभावी मार्ग आहे, असेही स्पष्ट करण्यात आले.
"राजहंस प्रकाशन', "मांडके हिअरिंग सर्व्हिसेस' आणि "तेज ज्ञान फाउंडेशन' तर्फे "बदलती जीवनशैली आणि योगाचे महत्त्व' या विषयावर अय्यंगार यांचे व्याख्यान आयोजित केले होते. त्या वेळी नागरिकांशी संवाद साधताना अय्यंगार म्हणाले, ""मी गुरू नसून, साधक आहे. विद्यार्थी गुरू मानतात, पण मी साधकासारखेच राहणार आहे.''
""मन, शरीर, चित्त, आत्मा एक असते, पण त्यांचे भाव पुष्कळ आहे. मन चंचल असते; परंतु शांत चित्त हे आत्मज्ञानाचा पाया आहे. शांततेशिवाय चित्त एकाग्र होऊ शकत नाही. त्यामुळे पतंजलींनी भक्तिमार्ग आणि अष्टांग योग असे योगशास्त्राचे दोन भाग केले आहेत,'' असे त्यांनी सांगितले.
ते म्हणाले, ""साध्या आणि सोप्या पद्धतीने योगासन पद्धती विकसित करण्यात आली आहे.''
या वेळी डॉ. नरसिंह मांडके आणि प्रदीप चंपानेरकर उपस्थित होते.