Print
Hits: 2428

सकाळ वृत्तसेवा
०२ मार्च २०११
पुणे, भारत

मोठ्या रुग्णालयांतील रुग्णसेवेवर दहा टक्के सेवाकराची तरतूद या वर्षीच्या अर्थसंकल्पात करण्यात आली आहे. त्यामुळे या रुग्णालयांतील पर्यायाने हृदयरोग व कर्करोगासारख्या गंभीर आजारांच्या उपचारांसाठीच खर्च वाढणार आहे. याचा फटका थेट रुग्णांचा बसणार आहे.

सरकारने या अर्थसंकल्पात मोठ्या म्हणजे 25 पेक्षा जास्त खाटा असलेल्या रुग्णालयांनाही कराच्या जाळ्यात ओढले आहे. तेथील उपचारांवर दहा टक्के सेवाकर लागू करण्यात येणार आहे. मात्र, अर्थसंकल्प सादर करताना त्याबद्दल अधिक स्पष्टीकरण देण्यात आले नसल्याने काही गोष्टींबद्दल संदिग्धता आहे. गंभीर आजारांवरील उपचार मोठ्या रुग्णालयांतच उपलब्ध आहेत. त्यामुळे गरीब अथवा श्रीमंत यांना नाइलाजाने मोठ्या रुग्णालयांतच जावे लागते. तेथे त्यांना आता जादा पैसे मोजावे लागतील. या करआकारणीला वैद्यकीय क्षेत्रातून विरोध केला जाण्याची शक्‍यता आहे.

याबद्दल रुबी हॉलचे संचालक डॉ. पी. के. ग्रांट म्हणाले, ""असा कर लावणे चुकीचे आहे. केंद्र सरकारने याचा फेरविचार केला पाहिजे. रुग्णालयात कोणी हौस म्हणून येत नाही. त्यामुळे इतर क्षेत्रातील निकष रुग्णालयांसाठी लावता येणार नाहीत. खासगी मोठ्या रुग्णालयांमध्ये हृदय आणि कर्करोगावरील अत्याधुनिक उपचार पद्धती उपलब्ध आहेत. आता तेथे उपचार घेण्यासाठी लोकांना जादा पैसे मोजावे लागतील.''

जहांगीर हॉस्पिटलतर्फे साईनाथ प्रधान म्हणाले, ""यापूर्वी विमाधारक रुग्णांवर व कार्पोरेट रुग्णांवर उपचारासाठीच हा कर होता. आता तो सर्वांना लागू करण्यात आला आहे. बिलावर दहा टक्के सेवाकर आणि त्यावर पन्नास टक्के परतावा असा हा प्रस्ताव आहे. त्यामुळे पाच टक्के तरी कर लागणारच आहे. याचा फटका साहजिकच रुग्णांना बसेल.'' महाराष्ट्र सरकारने नुकतीच वैद्यकीय शिक्षण विभागाच्या अखत्यारीतील रुग्णालयांची दरवाढ केली आहे. आता खासगी रुग्णालयांमध्येही जादा खर्च लागणार आहे.

Disclaimer: The news story on this page is the copyright of the cited publication. This has been reproduced here for visitors to review, comment on and discuss. This is in keeping with the principle of ‘Fair dealing’ or ‘Fair use’. Visitors may click on the publication name, in the news story, to visit the original article as it appears on the publication’s website.