सकाळ वृत्तसेवा
१६ जुलै २०११
पिंपरी, भारत
व्यसनांच्या प्रकारांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत असून, महिलाही मोठ्या प्रमाणात व्यसनांच्या विळख्यात अडकत असल्याची खंत मुक्तांगण संस्थेच्या संचालिका मुक्ता पुणतांबेकर यांनी व्यक्त केली.
चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात पुणे पोलिस व मुक्तांगण संस्थेच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या जागतिक अमली पदार्थविरोधी दिनानिमित्त व्यसनमुक्ती मार्गदर्शन कार्यक्रमात पुणतांबेकर बोलत होत्या. पोलिस परिमंडळ तीनचे उपायुक्त डॉ. ज्ञानेश्वर चव्हाण, सहायक आयुक्त सुधीर चौगुले, पोलिस निरीक्षक पी. बी. लोखंडे, टी. डी. गौड, नंदकुमार भोसले पाटील, सुनील यादव, अंमली पदार्थ विरोधी पथकाचे प्रमुख निरीक्षक सतीश देवरे, मुक्तांगण संस्थेचे प्रसाद चांदेकर, माधव कोल्हटकर, हर्षद पंडित आदी या वेळी उपस्थित होते. तसेच विविध शाळा-महाविद्यालयातील विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पुणतांबेकर म्हणाल्या, ""संस्थेच्या वतीने शहरात व्यसनमुक्ती जनजागृती कार्यक्रम राबविण्यात येतात. त्याचप्रमाणे शुक्रवारपासून शहरात व्यसनमुक्ती विरोधी सप्ताह आयोजित करण्यात आला आहे. संस्थेच्या माध्यमातून काम करताना गेल्या वर्षभरात कमी वयातील युवकांचे प्रमाण वाढत असल्याचे दिसून आले. विशेष म्हणजे व्यसनांमध्ये महिलांचेही प्रमाण वाढत असल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे संस्थेला "निशिगंध' नावाची स्वतंत्र संस्था सुरू करावी लागत आहे,' असेही त्यांनी सांगितले.
व्यसनांमुळे होणारे शारीरिक व मानसिक दुष्पपरिणाम या वेळी चित्रफितीद्वारे दाखविण्यात आले. त्याचप्रमाणे संस्थेच्या कार्यकर्त्यांनी नाटिकेद्वारे उपस्थितांना व्यसनांच्या कौटुंबिक व सामाजिक दुष्परिणांबाबत मार्गदर्शन केले. त्याचप्रमाणे संस्थेत उपचार घेत असलेल्यांनी अनुभवकथन केले. उपायुक्त डॉ. ज्ञानेश्वर चव्हाण यांनी प्रास्ताविक केले, तर सहायक आयुक्त सुधीर चौगुले यांनी आभार मानले.