Print
Hits: 3764

सकाळ वृत्तसेवा
०४ ऑक्टोबर २०११
पुणे , भारत

कानावर पडलेल्या आवाजाला बाळ प्रतिसाद देईना...वैद्यकीय तपासणीत सिद्ध झाले, मूल जन्मजात कर्णबधिर आहे... पण, केवळ खेद करण्यापेक्षा त्यातूनही मार्ग काढला पाहिजे... आपल्या मुलाबरोबरच इतरही कर्णबधिर बोलले पाहिजेत, हाच त्यांच्या जगण्याचा ध्यास झाला.... प्रयत्नातून वाचाप्रणाली विकसित झाली आणि अनेक मुले घडाघडा बोलायला लागली...

सध्या कर्करोगाच्या व्याधीने ग्रासले असतानाही देशातील मुलांनाही या प्रणालीचा फायदा मिळावा, यासाठी त्यांची धडपड सुरू आहे... पण आडवी येते ती संवेदनाहीन आणि सुस्त सरकारी यंत्रणा... हा लढा आहे वर्धा येथील ऍड. पंजाब शिरभाते यांचा...

शिरभाते यांचा दुसरा मुलगा वैभव जन्मतः कर्णबधिर आहे; पण तो मूकबधिर होऊ नये, त्याला बोलण्याचे योग्य प्रशिक्षण मिळावे, अशी त्यांची इच्छा होती; पण आव्हान उभे राहिले ते चांगल्या प्रशिक्षणाचे. मुलासाठी त्यांना योग्य पुस्तके, साधने मिळेनात. त्यामुळे त्याला शिकविण्याचा, त्यासाठी तंत्र विकसित करण्याचे शिरभाते यांनी ठरवले.

जिभेचा दात, ओठ येथे होणाऱ्या स्पर्शावरून व्यंजन, स्वरांचा उच्चार होतो; तसेच या वेळी घसा, टाळू येथे लहरी निर्माण होतात. त्याचा स्पर्श मुलांना जाणवून शिकविण्याची प्रणाली शिरभाते यांनी शोधून काढली.

शिरभाते म्हणाले, ""मुलांचा पहिल्या-दुसऱ्या वर्षात वाचाविकास होणे गरजेचे असते. सध्या मूकबधिर मुलांच्या शाळेत याविषयी शास्त्रीय दृष्टिकोन व नेमकेपणाचा अभाव जाणवतो. श्रवणयंत्राशिवाय त्यांच्यासाठी फारशी साधने नाहीत. जन्मतःच कर्णबधिर मुलांना या यंत्राचाही फायदा होत नाही. त्यामुळे तंत्रच विकसित होणे गरजेचे आहे.''

"आपण वर्णमाला शिकवताना कंठातून येणारे उच्चार पहिल्यांदा; तर ओठातून येणारे उच्चार नंतर शिकवतो. या पद्धतीला मुलांसाठी मी उलटे केले,'' असे सांगून शिरभाते म्हणाले, ""मी वायुपुराण, पाणिनी व्याकरणाचा अभ्यास केला. "पहिल्यांदा ओठातून येणारे उच्चार शिकवावेत,' असे पाणिनीने सांगितले आहे. मला ही प्रणाली सोपी वाटली. त्यामुळे मी तसे शिकविण्यास सुरवात केली. व्यंजने उच्चारण्यासाठी हाताची हालचाल करून जीभ कशी हलवायची, हे दाखवू लागलो. स्वरांचे उच्चार गळ्यावर हात ठेवून, ओठांतील अंतर आकाराद्वारे दाखवून शिकवले. पहिल्या बैठकीतच 48 पैकी 15 वर्ण मुले शिकू शकतात हे सिद्ध झाले.''

"मुलांना अशा पद्धतीने बाराखडी शिकण्यास सुमारे तीन महिने लागतात. काही मुलांना क, ख, ग, घ चा उच्चार येत नाही. त्यांना त, थ, द, न हे पर्याय द्यायचे. थोडे तोतरे वाटले, तरी ते संवाद साधू शकतात. नंतर मुलांचा शब्दसंग्रह वाढवायचा. ओठांच्या हालचालींवरून शब्द ओळखण्याची सवय वाढवायची. त्यामुळे इतरांचे बोलणे समजते,'' असे शिक्षणाचे सूत्रही शिरभाते यांनी सांगितले.


"सध्याच्या शिक्षणव्यवस्थेत शिक्षकच पुरेसे शिकलेले नसतात. समाजकल्याण व शिक्षण या खात्यांनाही मुलांच्या विकासात रस नाही. किंबहुना शाळेतील पटसंख्या कमी होऊ नये, अशीच इच्छा असल्याने सुधारणा होत नाही,'' हे अनुभवाचे बोलही त्यांनी सांगितले.

आपण शोधलेल्या प्रणालीचा फायदा देशभरातील मुलांना होण्यासाठी शिरभाते यांनी मराठीत "....आणि वैभव बोलू लागला' व हिंदीत "मूकबधिर वाणी उपचार प्रयास पद्धती' ही पुस्तके लिहिली आहेत. त्यांच्या पुस्तकाचे हिंदी, गुजराती, तेलगू, कन्नड, पंजाबी, सिंधी, तमीळ, मल्याळम्‌ या भाषांत भाषांतर झाले आहे. देशातील मुलांना ही प्रणाली शिकविण्याची इच्छा सरकारी सुस्तपणाच्या अनुभवानंतरही त्यांनी सोडली नाही. कर्करोगावर किमोचे उपचार घेत असतानाही त्यांनी जिद्द सोडली नाही. ते म्हणाले, ""मी प्रयत्न थांबविणार नाही. वाचाशिक्षण हा कर्णबधिरांचा जन्मसिद्ध हक्क आहे. मानवी हक्काचा भाग आहे. सरकारने प्रतिसाद दिलाच नाही तर, न्यायालयात जनहित याचिकाही दाखल करेल.''

Disclaimer: The news story on this page is the copyright of the cited publication. This has been reproduced here for visitors to review, comment on and discuss. This is in keeping with the principle of ‘Fair dealing&rsquo or ‘Fair use’. Visitors may click on the publication name, in the news story, to visit the original article as it appears on the publication’s website.