Print
Hits: 2682

सकाळ वृत्तसेवा
१० जानेवारी २०११
येरवडा, भारत

मनोरुग्णालयात दरवर्षी साठ ते सत्तर रुग्णांचा मृत्यू होत असून, यातील अनेक रुग्ण अकस्मात व औषधोपचाराच्या अभावी दगावत असल्याची धक्कादायक माहिती खुद्द अधीक्षक डॉ. मनोहर यादव यांनी दिली. नुकताच रुग्णालयातील दोन युवकांचा मृत्यू झाला. त्यामुळे ही बाब उजेडात आली.

याबाबत बोलताना डॉ. यादव म्हणाले, ""रामदास नामदेव नाईक (वय 35, रा. पिंपळगाव, ता. आंबेगाव) हा 14 डिसेंबर रोजी रुग्णालयात दाखल झाला होता. त्याला दहा वर्षांपासून सिझोफ्रेनियाचा आजार होता. त्याच्यावर उपचार सुरू होते. त्यादरम्यान त्याचा मृत्यू झाला. शवविच्छेदनानंतर त्याच्या मृत्यूचे कारण समजू शकेल. लालासाहेब गोकुळ धावडे (वय 24, रा. लिमटेक, ता. बारामती) हा 26 डिसेंबर रोजी दाखल झाला होता. त्याला वारंवार झटके येत होते. त्याचा गुरुवारी (ता. 6) दुपारी मृत्यू झाला.''

डॉ. यादव म्हणाले, ""वृद्ध मनोरुग्णांना त्यांचे नातेवाईक रुग्णालयात बळजबरीने दाखल करतात. त्यांना मानसिक आजारासोबतच शारीरिक व्याधीही असतात. काही दिवसांपूर्वीच उत्तम गोविंदराव पांढरे यांना "डेलेरियम'(पूर्णत: मद्यपानाच्या आहारी गेलेला रुग्ण) या आजारातून पूर्णपणे बाहेर काढण्यात आले आहे.'' रुग्णालयात सहा महिन्यांपासून औषधांचा तुटवडा आहे. सध्या रुग्णालयात दोन हजार 637 ब्लॅंकेट्‌स, अडीच हजार चादर, चौदाशे स्वेटर असून, साडेतीनशे पुरुषांना तर सव्वाशे महिला रुग्णांना स्वेटर कमी असल्याचे डॉ. यादव यांनी सांगितले.

मृत्यूबाबत शंका
मनोरुग्णालयात मागील सहा महिन्यांत सहा रुग्णांचा मृत्यू झाला आहे. याबाबत रुग्णालय प्रशासनाने जेल रोड पोलिस चौकीत अकस्मात निधन म्हणून नोंद केली आहे. मात्र, प्रत्येक वेळी प्रशासन आणि पोलिसांनी रुग्णाच्या मृत्यूची माहिती हेतुपूर्वक लपविल्याने या अशा मृत्यूबाबत संशय बळावत असल्याची चर्चा रुग्णालय कर्मचाऱ्यांमध्ये आहे.

Disclaimer: The news story on this page is the copyright of the cited publication. This has been reproduced here for visitors to review, comment on and discuss. This is in keeping with the principle of ‘Fair dealing’ or ‘Fair use’. Visitors may click on the publication name, in the news story, to visit the original article as it appears on the publication’s website.