Print
Hits: 3126

सकाळ वृत्तसेवा
११ सप्टेंबर २०११
योगीराज प्रभुणे
भारत, पुणे

देशातील मधुमेहींची संख्या कमी करण्यासाठी भविष्यातील माता असलेल्या तरुणींचे आरोग्य सुधारणे गरजेचे आहे; तरच "मधुमेहींची राजधानी' असलेल्या भारतातील मधुमेही रुग्णांची संख्या आटोक्‍यात ठेवता येईल, असे पुण्यातील "केईएम' रुग्णालयात झालेल्या आंतरराष्ट्रीय संशोधनातून सिद्ध झाले. गर्भात असल्यापासूनच मधुमेहाची बीजे शरीरात रोवली जातात, असे संशोधन पुण्यातील मधुमेह तज्ज्ञ डॉ. चित्तरंजन याज्ञिक यांनी केले आहे. या संशोधनाला आंतरराष्ट्रीय मान्यता मिळाली असून, या संशोधनाबद्दल डॉ. याज्ञिक यांना 2009 मध्ये "यूएन-युनेस्को हेल्मेट मेहनर्ट' पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. यापुढील मानाचा तुरा म्हणून त्यांना लवकरच "डेव्हिड बार्कर मेडल'ने गौरविण्यात येणार आहे. या निमित्ताने डॉ. याज्ञिक यांनी त्यांच्या संशोधनाची माहिती "सकाळ'ला दिली.

ते म्हणाले, ""मधुमेह होण्याच्या प्रक्रियेत प्रौढावस्थेतील जीवनशैलीचा हातभार असतो; पण याची सुरवात गर्भावस्थेपासूनच झालेली असते. भारतातील गरीब आणि कुपोषितांमधील मधुमेहाचे प्रमाण झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे हा आजार फक्त "श्रीमंतांचा आजार' नसल्याचे समोर आले आहे. त्यामुळे डॉ. कुरूस कोयाजी आणि बालरोगतज्ज्ञ डॉ. आनंद पंडित यांच्या मदतीने गर्भावस्थेपासूनच्या या संशोधनाचा प्रारंभ झाला. गेली 25 वर्षे संशोधन सुरू आहे.''

""या संशोधनामध्ये "केईएम' रुग्णालयात जन्मलेल्या चारशे मुलांचा अभ्यास करण्यात आला. या सर्व मुलांची वयाच्या चौथ्या वर्षी तपासणी केली. त्यात जन्मतः वजन कमी असलेल्या मुलांमध्ये साखर व इन्शुलिनची पातळी योग्य वजनाच्या मुलांपेक्षा जास्त होती. त्याला वैद्यकीय परिभाषेत "इन्शुलिन अवरोध' (इन्शुलिन रेझिस्टन्स) असे म्हणतात. म्हणजेच ती मुले मधुमेहाच्या पहिल्या पायरीवर होती. कमी वजनाची जन्मलेली काही मुले चार वर्षांपर्यंत जाड झाली होती. त्यांच्यामध्ये हा धोका सर्वाधिक प्रमाणात आढळला. या मुलांना त्या वेळी मधुमेह नव्हता; तरी भविष्यात त्यांना मधुमेह होणार असल्याची स्पष्ट लक्षणं त्यांच्यात दिसून आली,'' असे त्यांनी स्पष्ट केले.

""गर्भावस्थेत काही कारणांनी पोषण कमी झालेले असते. त्या वेळी शरीर तडजोड करण्यासाठी वाढीचा वेग कमी करते. त्यातून कमी वजनाच्या मुलाचा जन्म होतो. बाळाच्या शरीरातील पेशींना कमी पोषक वातावरणाची सवय होते. जन्मानंतर बाळ गुटगुटीत व्हावे म्हणून त्याला भरपूर पोषक आहार दिला जातो. त्याचा अतिरिक्त ताण बाळाच्या शरीरातील पेशींवर पडतो. त्याचा थेट परिणाम पेशींच्या कार्यक्षमतेवर होऊन त्या लवकर थकतात. यात इन्शुलिन तयार करणाऱ्या पेशींचाही समावेश असतो. त्यामुळे अशा मुलांना मधुमेहाचा धोका जास्त असते,'' असे डॉ. याज्ञिक यांनी स्पष्ट केले.

""सधन कुटुंबामध्ये गर्भावस्थेत अतिरिक्त पोषण दिले जाते. पर्यायाने बाळाचेही अतिपोषण होते. आईला मधुमेह असला तरीही हाच परिणाम होतो. त्यातून बाळाच्या शरीरात मोठ्या प्रमाणात चरबी जमा होते. त्यातून मधुमेहाचा धोका वाढतो. हा आजार पुढील पिढीत संक्रमित होण्याचा धोका टाळण्यासाठी आजच्या मुलींमध्ये म्हणजेच भावी मातांनी आपले आरोग्य गर्भधारणेपासूनच सुदृढ ठेवले पाहिजे. त्यासाठी सकस आहार, आवश्‍यक तेवढा व्यायाम आणि ताणतणावमुक्त जीवनशैली ही त्रिसूत्री अंगीकारली पाहिजे; तरच आपल्या भावी पिढीला निरोगी आणि मधुमेहापासून मुक्त करता येईल,'' असा विश्‍वासही डॉ. याज्ञिक व्यक्त केला.

या संशोधनासाठी केईएम रुग्णालयाच्या वडू येथील प्रकल्पाचे मोठे सहकार्य झाल्याची भावनाही त्यांनी व्यक्त केली.

संशोधनाला आंतरराष्ट्रीय पातळीवर मान्यता
मधुमेहाच्या जागतिक इतिहासाला या संशोधनामुळे कलाटणी मिळाली आहे. "पुणे चिल्ड्रन स्टडी' या नावाने जगभरात हे संशोधन प्रसिद्ध झाले आहे. मधुमेहाच्या जागतिक संघटनेनेही याची दखल घेऊन त्याप्रमाणे धोरण निश्‍चित करण्यात येत आहे. या संशोधनाबद्दल डॉ. याज्ञिक यांना जागतिक पातळीवरचा सर्वोच्च सन्मानाचा पुरस्कार मिळाला आहे.

Disclaimer: The news story on this page is the copyright of the cited publication. This has been reproduced here for visitors to review, comment on and discuss. This is in keeping with the principle of ‘Fair dealing’ or ‘Fair use’. Visitors may click on the publication name, in the news story, to visit the original article as it appears on the publication’s website.