Print
Hits: 3426

सकाळ वृत्तसेवा
२५ मार्च २०११

रोज एक सफरचंद, तेही सकाळी अनशापोटी खाल्ले, थोडा व्यायाम केला आणि रात्री बी व्हिटॅमिनची गोळी घेतली की मधुमेह नियंत्रणात येऊ शकतो, असा दावा पुण्यातील संशोधकाने केला आहे. या दाव्यामागील शास्त्रीय आधार, काही व्यक्तींचे अनुभव आणि काही तज्ज्ञांचा अशा प्रयोगांविषयीचा इशारा...खुल्या चर्चेसाठी...

सफरचंदच का?
डी. पी. पारखे यांनी मधुमेहावर नियंत्रण ठेवण्यासाठी "ऍपल थेरपी' विकसित केली आहे. एमएस्सी झुऑलॉजीची पदवी घेतलेल्या पारखे यांनी आतापर्यंत विविध विषयांवर संशोधन केले आहे. 1998 मध्ये वयाच्या 72 व्या वर्षी आपल्याला मधुमेह असल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी औषधे घेण्यास सुरवात केली आणि त्याबरोबरच मधुमेह नियंत्रणात कसा आणता येईल यासाठी संशोधनास सुरवात केली. आपल्या शरीरात चोवीस तासांत साखर कशी काम करते, याचा स्वतः तपासण्या करून त्यांनी अभ्यास केला. आंबा, केळी, मोसंबी, चिक्कू, डाळिंब, पेरू अशी फळे खाऊन रक्तातील साखरेचे प्रमाण तपासले, शेवटी सफरचंदामुळे साखरेचे प्रमाण नियंत्रणात राहू शकते, असे त्यांच्या लक्षात आले. अनशापोटी सफरचंद खाल्ल्यावर त्याचा योग्य परिणाम होत असल्याचे निरीक्षणाअंती स्पष्ट झाले. इंडियन इन्टिट्युट ऑफ टेक्‍नॉलॉजी (मुंबई)च्या ऍलम्नी असोसिएशन ऑफ पुणे चॅप्टरच्यावतीने पारखे यांच्या संशोधनाला मान्यता दिली आहे.

सफरचंदात काय असते?
पारखे यांनी सफरचंदाचे काही गुणधर्म मांडले. सफरचंदात मॅलिक ऍसिड (ऍपल ऍसिड), पेक्‍टीन, सॉरबिटॉल, सॉरबिक ऍसिड व फ्रुक्‍टोज असते. या फळात संत्र्याच्या सुमारे 1500 पट सायट्रिक ऍसिड असते. वेगवेगळ्या घटकांमुळे शरीरातील अतिरिक्त साखर जळून त्याचे उर्जेत रूपांतर होते. कसा परिणाम होतो?

मॅलिक ऍसिड :
हे ऍसिड ऍसिड्युलंट व ऍन्टीऑक्‍सिडंट चिलेटिंग व कॉम्लेसिंग एजंट आहे. त्याच्या तुरटपणामुळे शरीरातील जास्तीची साखर कमी होते. मॅलिक ऍसिडमुळे मेटलचिलेटस्‌ तयार होतात व ती जंतुनाशक म्हणून काम करतात.

सॉरबिटॉल :
हे एक प्रकारचे अल्कोहोल आहे. यामुळे साखरेचे स्फटिकीकरण होत नाही. याच्या सेवनाने रक्तातील साखर वाढत नाही. त्याला इन्शुलिनची गरज नसते. यकृतात ग्लुकोजेनच्या स्वरूपात साठून राहते. यामध्ये ऍटिकेटोनोजेनिक व व्हिटॅमिन बी कॉम्प्लेक्‍स साठविण्याची क्षमता असते. सॉरबिटॉलमुळे पोटातील उपयुक्त जिवाणू तयार होण्यास मदत होते.

फ्रुक्‍टोज :
हा पदार्थ सॉरबिटॉलपेक्षा दुप्पट व साखरेच्या 90 टक्के गोड असतो. हा पदार्थ आतड्यातून हळूहळू शोषला जातो. रक्तातील साखर न वाढण्यास कारणीभूत ठरतो.

अशी आहे "ऍपल थेरपी'
सकाळी अनशापोटी एक सफरचंद खावे. शक्‍यतो सिमला सफरचंद असावे. लाल आणि हिरवट असावे. (हिरवे सफरचंद टाळावे) त्यानंतर अर्धा तास पायी फिरायला जाणे. त्यानंतर वाटल्यास बिनसाखरेचा चहा घ्यावा. गोड खाणे पूर्णपणे टाळावे. (आहारातून साखर पोटात जाते.) रात्री झोपण्यापूर्वी बी कॉम्लेक्‍सची गोळी घ्यावी. (साखरेचे प्रमाण नियंत्रित करते.) डॉक्‍टरांनी दिलेल्या गोळ्या एकदम बंद करू नयेत. टप्प्याटप्याने तपासणीनंतर व डॉक्‍टरांच्या सल्ल्याने योग्य निर्णय घ्यावा. डॉक्‍टरांचा सल्ला घेऊनच "ऍपल थेरपी' सुरू करावी. -डी. पी. पारखे (अधिक माहितीसाठी www.applecontrolsdiabetes.com ही वेबसाईट पाहावी.) पथ्य, व्यायामानंतरच थेरपी उपयोगी

("ऍपल थेरपी'चा अनुभव घेतलेल्या काही व्यक्तींचे हे अनुभव.) मला वयाच्या 55 वर्षी मधुमेह असल्याचे समजले. मी सुरवातीला डॉक्‍टरांच्या गोळ्या घेण्यास सुरवात केली. त्यानंतर पारखे यांची "ऍपल थेरपी' सुरू केली. पथ्ये पाळली, व्यायाम केला. त्यानंतर आजतागायत साखरेचे प्रमाण नियंत्रित आहे. - सुनील बर्वे, निवृत्त बॅंक अधिकारी, वय 62

मला गेल्या वर्षी मधुमेह असल्याचे लक्षात आले. साखरेचे प्रमाण 350 ते 400 च्या आसपास होते. तातडीने डॉक्‍टरांचा सल्ला घेऊन गोळ्या घेण्यास सुरवात केली. त्याबरोबरच "ऍपल थेरपी'ही सुरू केली. नंतर गोळ्यांचे प्रमाण कमी केले. आता साखरेचे प्रमाण 104 च्या आसपास आहे. पथ्ये पाळल्याचा जास्त फायदा होतो. -एम. आर. पाटील, नोकरी, वय 32

अधिक संशोधन आवश्‍यक
सफरचंदामध्ये फ्रुक्‍टोज साखर आणि फायबरचे प्रमाण जास्त असल्याने ते इतर फळांच्या तुलनेत उपयुक्त आहे. मात्र सर्वच मधुमेहींना याचा फायदा होईल असे नाही. त्यामुळे या थेरपीबाबत शास्त्रीय संशोधन होण्याची आवश्‍यकता आहे. योग्य सल्ल्याशिवाय मधुमेह रुग्णांनी गोळ्या बंद करू नये. वेळच्या वेळी डॉक्‍टरांचा सल्ला घेऊन तपासणी करणे आवश्‍यक आहे.
- डॉ. शैलजा काळे, मधुमेह तज्ज्ञ

केवळ सफरचंद उपयोगी नाही
मधुमेहात पथ्याला महत्त्व आहे. केवळ सफरचंदावर मधुमेह नियंत्रित होणार नाही; योग्य आहार, पथ्ये आणि योग्य पद्धतीने व्यायाम केल्यास साखरेचे प्रमाण नियंत्रणात राहू शकते.
- डॉ. संजय कुलकर्णी, आयुर्वेद तज्ज्ञ

Disclaimer: The news story on this page is the copyright of the cited publication. This has been reproduced here for visitors to review, comment on and discuss. This is in keeping with the principle of ‘Fair dealing’ or ‘Fair use’. Visitors may click on the publication name, in the news story, to visit the original article as it appears on the publication’s website.