ई सकाळ
०७ नोव्हेंबर २०११
मुंबई भारत
बदलत्या जीवनशैलीमुळे मधुमेहासारख्या आजाराचे प्रमाण वाढले आहे. मधुमेहाच्या रुग्णांची वाढती संख्या ध्यानात घेऊन, या आजारावर नियंत्रण मिळविण्यासाठी मुंबई महापालिकेचे कर्मचारी 14 नोव्हेंबरपासून घरोघरी जाऊन तपासणी करणार आहेत.
मुंबईत गेल्या काही वर्षांत मधुमेहाच्या रुग्णांची संख्या झपाट्याने वाढली आहे. अनेक वेळा हा आजार प्राथमिक अवस्थेत लक्षात येत नाही. हा आजार बळावण्यापूर्वीच नियंत्रणात आणण्यासाठी महापालिकेने विशेष मोहीम आखली आहे. जागतिक मधुमेहदिनी 14 नोव्हेंबरपासून ही मोहीम सुरू होईल, असे महापालिकेच्या आरोग्य विभागाने सांगितले.
मलेरिया नियंत्रणासाठी पालिकेने अशीच मोहीम आखली होती. त्यामुळे यंदा मलेरिया आटोक्यात आला. मधुमेहाच्या विरोधातही अशीच मोहीम सुरू करण्याचा पालिकेचा संकल्प आहे.
त्यासाठी नेमलेल्या तज्ज्ञ डॉक्टरांना के.ई.एम. रुग्णालयात प्रशिक्षण देण्यात आले. महापालिकेच्या 27 दवाखान्यांत जीवनशैलीमुळे उद्भवणाऱ्या आजारांबाबत तपासणी केली जाणार आहे.