सकाळ वृत्तसेवा
२३ फ़ेबुवारी २०११
नवी मुंबई, भारत
लहान मुलांमधील बहिरेपणावरील उपचार हे अजूनही वैद्यकीय क्षेत्रापुढे आव्हान आहे; मात्र अशा आजारावर आशेचा किरण दिसला तो "स्टेम सेल्स'च्या रूपात. या संशोधनाच्या मुख्य संशोधक आहेत एक मराठमोळ्या कान, नाक, घसा तज्ज्ञ डॉक्टर. त्यांचे नाव आहे सोनाली पंडित.
डॉ. पंडित यांनी नाकातील विशिष्ट प्रकारच्या "स्टेम सेल्स' लहान मुलांमधील बहिरेपणाशी साधर्म्य असलेल्या बहिऱ्या उंदराच्या अंतर्कानात ट्रान्सप्लांट केल्या. त्यानंतर चार आठवड्यांनी त्यांनी उंदराची ऐकण्याची क्षमता तपासली. त्या वेळी स्टेम सेल्सचे उपचार न केलेल्या उंदरांच्या तुलनेत त्याला चांगले ऐकू येत असल्याचे आढळले, असे डॉ. पंडित यांनी सांगितले. या स्टेम सेल्स विशिष्ट प्रकारचे रासायनिक द्रव्य उत्सर्जित करून अंतर्कानातील इतर पेशींना जिवंत ठेवण्यास मदत करतात. त्यामुळे ऐकू येण्यास मदत होते, असे तज्ज्ञांचे मत असल्याचे त्यांनी सांगितले.
नाकातील स्टेम सेल्सचा उपयोग बहिरेपणाच्या उपचारांसाठी होत असल्याचे प्रथमच या संशोधनातून सिद्ध झाले आहे. या संशोधनामुळे लहान मुलांबरोबरच ज्येष्ठ नागरिकांमध्येही आढळणारी बहिरेपणाची लक्षणे दूर होण्यास मदत होऊ शकते, असे डॉ. पंडित यांनी सांगितले. यासंदर्भात आणखी सखोल संशोधन सुरू असून, सात ते दहा वर्षांनंतर माणसांवर या उपचार पद्धतीला सुरुवात होऊ शकते. हे संशोधन डॉ. पंडित यांनी ऑस्ट्रेलियातील गारव्हान इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल रिसर्च सेंटरमध्ये डॉ. शॅरन ओलेस्केनिच यांच्या मार्गदर्शनाखाली पूर्ण केले आहे. त्या सध्या वाशीतील फोर्टिज हिरानंदानी रुग्णालयात कान, नाक, घसा तज्ज्ञ म्हणून काम करीत आहेत. हे संशोधन भारतात सुरू ठेवण्याचा त्यांचा मानस आहे.