Print
Hits: 2505

सकाळ वृत्तसेवा
०२ मार्च २०११
शर्मिला कलगुटकर
मुंबई, भारत

वाढत जाणाऱ्या महाकाय देहामुळे इंग्लडच्या स्मिथला जगणंच नकोस झालं होतं. थोडंथोडकं नव्हे, तर तब्बल 370 किलो वजन घटविण्यासाठी त्यानं महागड्या औषधांपासून "डाएट'पर्यंत हरेक उपाय केले; पण वजनाचा काटा हलेल तर शपथ! भरीस भर म्हणून युरोप, अमेरिका, इंग्लड येथील असंख्य तज्ज्ञ डॉक्‍टरांनी शस्त्रक्रिया करून त्याचे वजन कमी करण्यासही नकार दिला; मात्र मुंबईच्या हिरानंदानी; तसेच पुण्याच्या रुबी हॉल क्‍लिनिकमधील "ओबेसिटी सेंटर'चे संचालक डॉ. शशांक शहा व डॉ. जयश्री तोडकर यांनी आशिया खंडातील या सर्वाधिक "अवजड' रुग्णावर यशस्वी शस्त्रक्रिया करून 150 किलोंनी त्याचे वजन घटविले. त्यांच्या वैद्यकनैप्युण्याची दखल आता खुद्द "बीबीसी'नेही घेतली आहे. सायबांच्या राज्यातील पाहुण्याच्या या वैद्यकीय अगत्याबद्दल स्मिथसह डॉक्‍टरांवर केलेली विशेष डॉक्‍युमेंटरी उद्या (ता. 2) रात्री साडेदहा वाजता "बीबीसी'वरून प्रदर्शित होणार आहे.

सहा वर्षांपूर्वी स्मिथचं वजन झपाट्यानं वाढू लागलं. पाहता-पाहता ते 370 किलो झालं. या व्याधीस वैद्यकीय संज्ञेमध्ये "सुपरहायपर ओबेसीटी' म्हणतात. ही व्याधी दुर्मिळ असून, या रुग्णाचे वजन कमी करण्यासाठी केल्या जाणाऱ्या शस्त्रक्रियेमध्ये रुग्ण अनेकदा त्यावेळीही दगावण्याचीही शक्‍यता असते. म्हणूनच सहसा डॉक्‍टरांकडून याकामी पुढाकार घेतला जात नाही. युरोप, अमेरिकेतील अनेक डॉक्‍टरांकडून नकार मिळाल्यानंतर स्मिथने डॉ. तोडकर व डॉ. शहा यांना त्याबाबत "ई-मेल' पाठविला. या "महाकाय' रुग्णावर शस्त्रक्रिया करण्यापूर्वी डॉक्‍टरांनी अवघ्या आठ दिवसांत शस्त्रक्रियेची जय्यत तयारी केली.

इंग्लडहून भारतात येण्यापूर्वी "वेटलॉस'साठीच्या काही महत्त्वपूर्ण टिप्सही स्मिथला देण्यात आल्या. ही शस्त्रक्रिया झाल्यानंतर स्मिथचे 70 किलो वजन घटले. पुढील काही दिवसांमध्ये तितकेच वजन पथ्य आणि व्यायामाच्या मदतीने कमी करण्यात आले. ही शस्त्रक्रिया करण्याच्या वेळी क्षुल्लकशीही चूक स्मिथच्या जीवावर बेतण्याची शक्‍यता होती; तरीही डॉ. तोडकर व त्यांच्या पथकाने हे आव्हान पेलले. भारतामध्येही स्थूलत्वाची समस्या प्रामुख्याने वाढती असली; तरीही अन्य देशांमध्ये तिच्या स्वरूपांमध्ये-लक्षणांमध्ये जी अनुवांशिकता,आहार, गुणसूत्रे यांच्यातील घटक प्रामुख्याने दिसून येतात. त्यामुळे त्या-त्या देशानुरुप, भौगोलिक परिस्थितीनुरुप या रुग्णांचा अभ्यास करणे महत्त्वाचे असते, असे मत डॉ. जयश्री तोडकर यांनी व्यक्त केले आहे. स्मिथला झालेली सुपर ओबेसिटीसारखी व्याधी रुग्णाचा आत्मविश्‍वासच खच्ची करते, त्यामुळे त्याचे वैयक्तिक आयुष्य तर ढवळून निघतेच; पण त्याच्या "सोशल लाइफ'वरही मोठ्या प्रमाणात परिणाम होतो. असे रुग्ण कमी वयात दगावतात. स्मिथलाही या साऱ्या दुष्टचक्रातून जावे लागले होते; मात्र ही शस ्त्रक्रिया यशस्वीरीत्या पार पडल्यानंतर स्मिथने "हे निव्वळ स्वप्नातच होऊ शकते...' ही व्यक्त केलेली प्रतिक्रियाच खूप बोलकी होती. स्थूलपणामुळे आयुष्याला विराम मिळालेला स्मिथ आता पुन्हा आयुष्याची नवी सुरुवात करतोय... त्यासाठी त्याने या वैद्यकतंत्रज्ञानाचा यशस्वी वापर करून रुग्णाची आस्थेने जपणूक करणाऱ्या भारतीय डॉक्‍टरांचेही मनोमन आभार मानले आहेत. स्मिथने या डॉक्‍टरांना दिलेली ही शाबासकीची पावती इंग्लंडने आवर्जून केलेल्या प्रशस्तिपत्रकातूनही व्यक्त झाली आहे.

Disclaimer: The news story on this page is the copyright of the cited publication. This has been reproduced here for visitors to review, comment on and discuss. This is in keeping with the principle of ‘Fair dealing’ or ‘Fair use’. Visitors may click on the publication name, in the news story, to visit the original article as it appears on the publication’s website.