सकाळ वृत्तसेवा
३० एप्रिल २०११
पुणे, भारत
कला, विविध उपक्रम आणि प्रयोगातून मानसिक ताणतणाव नियोजनाचे तंत्र नावीन्यपूर्ण पद्धतीने विकसित केल्याबद्दल पुण्यातील मानसोपचारतज्ज्ञ डॉ. विद्याधर बापट यांना न्यूजमेकर ब्रॉडकास्टिंग अँड कम्युनिकेशनतर्फे (एनबीसी) दिला जाणारा प्रतिष्ठित "बेस्ट डॉक्टर, न्यूजमेकरर्स अचिव्हर 2011' या पुरस्काराने गौरवण्यात येणार आहे.
सामाजिक योगदानाबद्दल वेगवेगळ्या क्षेत्रांतील व्यक्तींना हा पुरस्कार देण्यात येतो. त्यातील मानसशास्त्र विभागासाठी संपूर्ण देशातून त्यांची निवड करण्यात आली. डॉ. बापट यांनी इंग्लंड येथील बर्मिंगहॅम, लंडन व ऑक्सफर्ड थेरपी सेंटरमधून मानसशास्त्राचे विविध अभ्यासक्रम पूर्ण केले आहेत. शहरात ते त्यांच्या ज्योर्तिगमय संस्थेच्या माध्यमातून मानसिक आजारांबरोबरच ताणतणावमुक्तीसाठी विविध व्यायाम आणि उपक्रम राबवत आहेत.
पुरस्कार मिळाल्याबद्दल डॉ. बापट यांनी आनंद व्यक्त केला. ते म्हणाले, ""मानसिक ताणतणावाची सुरवात लहानपणापासून होते. त्यामुळे प्रत्येकाने स्वस्थता मिळवण्याची कला शिकणे गरजेचे आहे. नैराश्यपीडितांना तर कला हे उत्तम औषध आहे. कारण त्रासासाठी कला हा आनंद स्रोत असू शकतो. नैराश्य व मानसिक आजार असलेल्या लोकांसाठी कला नावीन्यपूर्ण मार्ग आहे. पुरस्कार मिळाल्यामुळे हे तंत्र अनेक लोकांपर्यंत पोचेल याचा मनापासून आनंद होत आहे.''
संगीत, नृत्य, अभिनय अशा विविध कलांच्या माध्यमातून मनःशांती मिळवण्याचे तंत्र त्यांनी विकसित केले आहे. शारीरिक व्यायामाप्रमाणे मानसिक व्यायामासाठी "ब्रेन जीम'; तसेच कॉर्पोरेट क्षेत्रातील लोकांसाठी "पीस ऑफ माईंड अँड लाइफ स्कील' हा उपक्रम ते राबवतात.
स्किझोफ्रेनिया व विविध मानसिक आजारांवर आधारित "माझी गोष्ट' या चित्रपटाची निर्मिती व दिग्दर्शनही त्यांनी केले आहे. हा चित्रपट संपूर्ण जगभर दाखवला गेला; तसेच मानसिक आजार असलेल्यांच्या विविध कलांचा समावेश असणारा "अंतर्नाद' हा कार्यक्रम त्यांनी भारताबरोबरच अमेरिका व रशियामध्ये सादर केला.
पुरस्कार वितरण सोहळा रविवारी (1 मे) मुंबई येथील हॉटेल ट्रायडंट येथे होणार आहे.