ई सकाळ
०५ डिसेंबर २०११
पुणे भारत
""संपूर्ण आरोग्याचा पाया म्हणजे पचन संस्था आहे. ती मजबूत नसेल तर अनेक रोग होतात. आपल्या प्रकृतीला योग्य असाच आहार ठेवावा. सर्व रसयुक्त आहार असावा. जेवणापूर्वी आल्याच्या तुकड्याला मीठ, लिंबू लावून खाल्यास पचनशक्ती वाढते,'' असे मत ज्येष्ठ आयुर्वेदाचार्य डॉ. श्री बालाजी तांबे यांनी व्यक्त केले.
फॅमिली डॉक्टर क्लबची नववर्षातील (2011-12) पहिली दृक्श्राव्य बैठक (व्हिडिओ कॉन्फरन्स) रविवारी झाली. त्या वेळी पुणे, मुंबई, नाशिक, नागपूर, औरंगाबाद, सोलापूर, जळगाव, कोल्हापूर या ठिकाणच्या सदस्यांशी डॉ. तांबे यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे आरोग्य संवाद साधला. लहान मुलांना जाणवणाऱ्या अडचणींपासून ज्येष्ठांना जाणवणाऱ्या अनेक आरोग्यविषयक समस्यांचे त्यांनी या वेळी निराकरण केले. तसेच, "पचनाचे त्रास' या विषयावरही त्यांनी मार्गदर्शन केले. कार्ला येथील आत्मसंतुलन व्हिलेजच्या डॉ. मालविका तांबे, डॉ. भाग्यश्री झोपे यांनीही सदस्यांच्या प्रश्नांना उत्तरे दिली.
पचनाच्या समस्यांविषयी डॉ. तांबे म्हणाले, ""सत्त्व, रज, तम या प्रकारचे आहार असतात. आहाराकडे लक्ष दिल्यास औषधावरचा मोठा खर्च वाचू शकतो. पचनास मदत मिळण्यासाठी जेवणापूर्वी थेंबभर पाणी प्यावे. लिंबूरस व मीठ किंवा आले, लिंबूरस व मध एकत्र करून घ्यावे. हिंग पचनशक्ती वाढवतो; पण हाडे ठिसूळ करतो. त्यामुळे त्याचाही आहारात योग्य प्रमाणातच वापर असावा. लोणी काढलेल्या ताकाला जिरे पावडर, हिंग, कढीलिंब, कोथिंबीर यांची फोडणी देऊन मीठ घालून जेवणानंतर घ्यावे. चांगल्या आरोग्यासाठी आहारात तुपाचाही योग्य प्रमाणात समावेश असावा.''
शरीरातील सर्व मल बाहेर पडणे अत्यंत महत्त्वाचे आहे, असे सांगून ते म्हणाले, ""युवावर्ग दूध, तूप, भात घेण्याचे टाळतात. पण त्यामुळे शौच कडक होऊन त्रास होतो. पोट साफ होण्यासाठी एरंडेलतेलाचा चांगला फायदा होतो. लहानपणापासून मुलांवर खाण्याचे योग्य संस्कार केले पाहिजेत. मुलांच्या आवडीनिवडी जरूर लक्षात घ्याव्यात; पण अतिलाड केल्याने नुकसान होते. एका ठिकाणी बसून व वेळेवर जेवणाची सवय लावली पाहिजे. वरण-भात, पोळी, लिंबू, फळभाजी, कडधान्य, पालेभाजी व थोडेसे गोड असा चौरस आहार असावा.''
पंचकर्माविषयी ते म्हणाले, ""केंद्रात राहून पंचकर्म केल्यास फायदा होतो. कारण त्यामध्ये तूप खाणे, फिरणे, योगासने, बस्ती अशा अनेक उपचारांचा समावेश असतो. पंचकर्मातील सर्व क्रिया योग्य पद्धतीने न केल्यास हवा तितका फायदा होत नाही.''
डॉ. मालविका तांबे म्हणाल्या, ""महिलांमध्ये हार्मोन्सचे संतुलन राहणे अत्यंत महत्त्वाचे असते. शास्त्रोक्त पद्धतीने पंचकर्म केल्यास चांगला फायदा होतो.'' पचन चांगले राहण्यासाठी जठराग्नीचे काम व्यवस्थित होणे गरजेचे असते. अग्नी मंदावल्यास पचनक्रिया बिघडते, असे डॉ. झोपे यांनी नमूद केले.