सकाळ वृत्तसेवा
२२ फ़ेबुवारी २०११
शर्मिला कलगुटकर
मुंबई, भारत
राज्याच्या दुर्गम भागातील रुग्णांनाही अत्याधुनिक वैद्यकीय सेवा त्वरित मिळाव्यात यासाठी जे. जे. रुग्णालयात सुरू झालेले टेलिमेडिसिन संपर्क केंद्र आता लवकरच ग्लोबल होणार आहे. ग्रामीण भागातील डॉक्टरांना असाध्य व्याधींसाठी; तसेच अवघड शस्त्रक्रियांसाठी नेमकी कोणती उपचारपद्धती वापरावी यासाठी व्हिडीओ कॉन्फरसिंग; तसेच ऑनलाईन सुविधेच्या माध्यमातून मार्गदर्शन करणारे हे केंद्र आता जगभरातील कोणत्याही रुग्णाचे निदान व उपचारपद्धतीबाबत मार्गदर्शन करण्यासाठी खुले होणार आहे. सर्पदंशापासून कुपोषणापर्यंत, मज्जारज्जूंच्या व्याधीपासून अनेक गुंतागुंतीच्या शारीरिक व्याधी असणाऱ्या सात हजार रुग्णांना या ई क्रांतीचे वैद्यकीय लघुरूप असणाऱ्या या केंद्राने जीवनदान दिले आहे. भारताचे वैद्यकीय क्षेत्रातील अमूल्य योगदान महासत्ता म्हणविणाऱ्या अनेक देशांनी मान्य केले असून, येथील वैद्यक क्षेत्रातील तज्ज्ञांचा लाभ घेण्यासाठी अन्य देशांमधून मागणी होत आहे. ती पाहता या टेलिमेडिसिन सुविधेचा वापर आता "ग्लोबल' करण्यात येणार आहे. ग्रामीण भागांसाठी खऱ्या अर्थाने सुरू झालेल्या या केंद्राद्वारे जे. जे. रुग्णालयातील तज्ज्ञांचा ठसा आता जगाच्या नकाशावरही तितकाच प्रभावीरीत्या उमटणार आहे.
राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानातर्फे सुरू झालेल्या या टेलिमेडिसिन केंद्राने अवघ्या दोन वर्षांत सात हजार रुग्णांना जीवनदान दिले आहे. जिल्हा आरोग्य केंद्रावर डॉक्टर-परिचारिका प्रशिक्षित असल्या, तरीही तेथे अनेकदा वैद्यकीय उपकरणे, तंत्रज्ञान आणि औषधांची उपलब्धता तितक्या मोठ्या प्रमाणात नसते. नव्याने येणाऱ्या साथींचा सामना करण्यासाठी लागणारी पूर्वतयारीही कित्येक वेळा केली जात नाही. रेडिओलॉजी, बायोटेक्नॉलॉजी, ईसीजी, एमआरआय यासारख्या महागड्या वैद्यकसेवांही या केंद्रावर नसतात. त्यामुळे या तंत्रज्ञानाचा वापर करून रुग्णाच्या व्याधीचे निदान करणे शक्य होत नाही. ग्रामीण भागातील आरोग्य केंद्रावरही ही अडचण लक्षात घेऊन टेलिमेडिसिनने नुकतीच व्हिडीओ कॉन्फरसिंग, ई-मेल्स या "ई' क्रांतीसोबत आता वैद्यक उपकरणांबाबत डिजिटल प्रणालीही वापरात आणली आहे. त्याच्या सहाय्याने गावातील आरोग्य केंद्रावर असणाऱ्या रुग्णाच्या नाडीपरीक्षा, रक्तदाब तपासणे, ईसीजी तपासणे, रेडिओलॉजी तंत्रज्ञानाचा वापरही "ऑनलाईन' पद्धतीने यशस्वीपणे केला जात असल्याचे या संपर्क केंद्राचे प्रमुख डॉ. सय्यद मेहदी यांनी "सकाळ'ला सांगितले. राज्यात वीस जिल्हा आरोग्य केंद्रांवर सुरू असणारी ही टेलिमेडिसिन केंद्रे आता नव्याने तीस ठिकाणीही सुरू करण्यात येणार आहेत. अलिबाग, सिंधुदुर्ग, गडचिरोली, गोंदिया यासारख्या ठिकाणांहून विचारणा होणाऱ्या उपचारपद्धतींचे प्रमाण सर्वाधिक आहे.
टेलिमेडिसिन केंद्र होणार ग्लोबल
- Details
- Hits: 2511
0