Print
Hits: 3384

महाराष्ट्र टाईम्स
३० सप्टेंबर २०११

डॉक्टर आणि रुग्णांचे नेहमीच संबंध येत असतात. मात्र, रुग्णाला नेमका काय आजार झाला आहे, याची माहिती बऱ्याचदा डॉक्टरांकडून रुग्ण अथवा त्याच्या नातेवाईकांना दिली जात नाही. त्यामुळे संबंधितांना आजाराची व्याप्ती जाणून घेण्यापेक्षा त्यावर करण्यात येणाऱ्या उपचारांकरीत पैशांची तरतूद करण्यासाठी पळापळ करावी लागते. दरम्यान, या स्थितीतूनच डॉक्टर आणि रुग्णामधील संबंध ताणले गेल्याने त्यांच्यात दुरावा निर्माण झाला आहे. त्यामुळेच डॉक्टरांविषयी रुग्णांमध्ये नाराजीची भावना निर्माण झाली आहे. यामुळेच रुग्णहक्काची जपणूक व्हायला हवी यासाठी जनआरोग्य अभियान, रुग्ण हक्क समिती, आयएमएसारख्या संघटनांनी लढा उभारला आहे.

रुग्णावर उपचार करताना त्यातूनच डॉक्टर आणि रुग्णांत ऋणानुबंध निर्माण होतात. या संबंधांची जाणीव ठेवून डॉक्टरांनी रुग्णाच्या हिताचा विचार करणे अपेक्षित आहे. रुग्णांची हतबलता ओळखून डॉक्टरांनी त्यांच्या मानवी हक्कांची जपणूक करावी अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. डॉक्टरांनी रुग्णांचा जीव वाचविण्याकडे अधिक लक्ष द्यायला हवे. गरीब, श्रीमंत, स्त्री पुरूष, शहरी की ग्रामीण भाग याबाबत कोणताही भेदभाव न करता माणूस या नात्याने रुग्णाचे मानवी हक्क आणि त्याच्या जबाबदाऱ्यांचे पालन केले पाहिजे. त्यासाठी रुग्णांचे हक्क कोणते हे पाहणे गरजेचे आहे.

प्रथमोपचार मिळण्याचा हक्क
सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार कोणत्याही जखमी रुग्णाला त्याचे हक्क मिळणे आवश्यक आहेत. त्याच्या जखमेतून होणारा रक्तस्त्राव नियंत्रित करणे, वेदनाशमक औषधे देणे, त्याची प्रकृती स्थिर करणे यावर डॉक्टरांनी लक्ष केंदीत करण्याची आवश्यकता आहे.

आजाराची माहिती मिळण्याचा हक्क
रुग्णास दाखल केल्यानंतर आजाराचे निदान झाले का, आजाराचे स्वरुप, त्याची गंभीरता आणि उपचार केल्यावर त्याचा काय परिणाम होईल याची माहिती रुग्ण किंवा त्याच्या नातेवाईकांना डॉक्टरांनी द्यायला हवी. रुग्णाच्या आजाराची त्यांच्या नातेवाईकांना किती माहिती द्यायची, कोणती माहिती द्यायची हे डॉक्टरांनी त्यांच्या अनुभवानुसार ठरवावे. मात्र, रुग्णाच्या प्रकृतीसंदर्भात कोणती अडचण असल्यास नातेवाईकांनी थेट डॉक्टरांनाच विचारावे. त्यातून त्यांच्यात संवाद घडू शकतो. हा संवाद घडताना उपचाराचा खर्च किती येऊ शकतो. त्यावर ऑपरेशन क रणे गरजेचे आहे काय किंवा खर्चात बदल होण्याची शक्यता आहे काय याची माहिती डॉक्टरांनी देणे आवश्यक आहे. रुग्णाच्या नातेवाईकांनी केसपेपरची मागणी केल्यास एक प्रत देण्यास हरकत नसावी. यासाठी आवश्यक ते शुल्कही आकारावे. रुग्णाला डिस्चार्ज देताना त्याच्या नातेवाईकांच्या हाती पडणारे भरमसाठ बिल पाहिल्यानंतर त्यांच्या छातीत धडकी भरायला लागते. त्यासाठी खाटांचे भाडे, विविध तपासण्या आदींचे तपशील डॉक्टर अथवा हॉस्पिटलने देणे आवश्यक आहे. त्यामुळे सर्व गोष्टी स्पष्ट होऊन गैरसमजांची निमिर्ती होणार नाही.

डिस्चार्ज कार्ड मिळावे
रुग्णाला डिस्चार्ज करतेवेळी 'डिस्चार्ज कार्ड' मिळावे, अशी अपेक्षा आहे. त्याला झालेल्या आजाराच्या निदानापासून केलेल्या उपचारांसह औषधांचीही माहिती त्यात स्पष्ट केल्याने रुग्णांसाठी ते महत्त्वाचे ठरते. त्यावर डॉक्टरांच्या सल्ल्याविना औषधे बंद करू नये अशी सूचना करणे देखील आवश्यक आहे.

उपचारासाठी संमती
डॉक्टरांकडून होणाऱ्या प्रत्येक उपचाराची माहिती रुग्णाला मिळायला हवी. त्यावर होणारे उपचारही नाकारण्याची त्याला मुभा असावी. परंतु, त्याची सर्वस्वी जबाबदारी त्याच्यावरच राहील.

गोपनीयतेचा हक्क
रुग्णाला कोणता आजार झाला आहे, याची माहिती त्याची पत्नी किंवा जवळचे नातेवाईक यांच्याशिवाय अन्य कोणालाही कळता कामा नये. त्याबाबत हॉस्पिटलमधील कर्मचाऱ्यांनी देखील रुग्णांची ओळख (आयडेंटिटी) खुली करता कामा नये. म्हणजेच एखाद्या रुग्णाला 'एचआयव्ही'चा संसर्ग झाल्यास त्याची माहिती इतरांपुढे जाता कामा नये याची खबरदारी डॉक्टरांनी घ्यावी.

सेकंड ओपिनियन घेण्याचा हक्क
रुग्णाला दुसऱ्या तज्ज्ञ डॉक्टराचा सल्ला घेण्याचा हक्क असावा. त्यासाठी आवश्यक ते मेडीकल रिपोर्टस रुग्णाला वेळच्यावेळी मिळायला हवेत. मात्र, त्या तज्ज्ञ डॉक्टरांचे मत पहिल्या डॉक्टरावर अंमलात आणण्याचे बंधन राहणार नाही.

रुग्णांची प्रतिष्ठा जपावी
रुग्णांवर उपचार करताना त्याची अवहेलना, कुचेष्टा होणार नाही याची खबरदारी डॉक्टरांसह कर्मचाऱ्यांनी घ्यायला हवी.

' एचआयव्ही'बाधितांशी भेदभाव करू नये, 'एचआयव्ही' झाला म्हणून त्यांच्याशी भेदभाव करू नये, तसेच त्याला उपचारही नाकारू नये. उपचार मिळणे हा त्याचा हक्क आहे.

उपचारातील पर्याय निवडण्याचा हक्क
उपचारादरम्यान रुग्णाला त्यातील चांगल्या पर्यायांची माहिती डॉक्टरांनी देणे आवश्यक असून, त्याचे भविष्यात होणारे फायदे तोटेही सांगण्याची आवश्यकता आहे.

सूचना, तक्रार करण्याचा हक्क
रुग्णहक्कांची पायमल्ली होत असल्यास त्याची तक्रार करण्याचा अधिकार मिळायला हवा.
धर्मादाय हॉस्पिटलमध्ये मोफत उपचार
मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार धर्मादाय हॉस्पिटलमध्ये गरीब रुग्णांना दहा टक्के खाटा तसेच, आथिर्कदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी सवलतीच्या दरात उपचारासाठी दहा टक्के खाटा मिळायला हव्यात. यां सारख्या रुग्णहक्कांची जपणूक करण्यासाठी आता डॉक्टरांची तयारी असली तरी, त्याला आता रुग्णांनीही डॉक्टरांना मदत के ल्यास डॉक्टर आणि रुग्णांमध्ये चांगले आणि सुदृढ संबंध प्रस्थापित होतील यात, शंकाच नाही.

Disclaimer: The news story on this page is the copyright of the cited publication. This has been reproduced here for visitors to review, comment on and discuss. This is in keeping with the principle of ‘Fair dealing’ or ‘Fair use’. Visitors may click on the publication name, in the news story, to visit the original article as it appears on the publication’s website.