सकाळ वृत्तसेवा
१० फ़ेबुवारी २०११
पुणे,भारत
जनगणनेत योग्य प्रकारे अपंग व्यक्तींची नोंदच होत नसल्याने लोकसंख्येतील त्यांचा आकडाही दुर्लक्षित राहतो. हे टाळण्यासाठी कुटुंबप्रमुखांनी विशेष दक्षता घेऊन कुटुंबातील अपंग व्यक्तीची नोंद जनगणना तक्त्यामधील रकाना क्र. 9 मध्ये करावी, असे आवाहन अपंग जनगणना आंदोलन समिती 1985 तर्फे करण्यात आले आहे.
अपंगांचे योग्य प्रकारे पुनर्वसन होण्यासाठी त्यांचा लोकसंख्येतील निश्चित आकडा सर्वांसमोर येणे गरजेचे आहे, त्यासाठी अपंग जनगणना जनजागरण अभियान राबविले जात असल्याचे समितीचे संस्थापक अध्यक्ष बाबूराव तेलंग यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत सांगितले. ऍड. श्यामराव पाटोळे उपस्थित होते.
तेलंग म्हणाले, ""यंदा अपंगांची स्वतंत्र जनगणना होत आहे. 2001 मध्ये जनगणना आयोगाने काळजीपूर्वक दखल घेऊनसुद्धा लाभार्थी अपंग, अपंगांचे पालक यांनी विशेष काळजी न घेतल्यामुळे प्रत्यक्ष जनगणनेत अपंगांची अपेक्षित आकडेवारी आली नाही. त्यामुळे अपंग, अपंगांचे पालक, आप्त-नातेवाईक यांनी जनगणना अधिकारी गाव, वाडी-वस्ती व घरी आल्यावर अपंगांची माहिती द्यावी. कुटुंबप्रमुखांनी जनगणना तक्त्यातील रकाना क्र. 9 मध्ये अपंगांची नोंद दक्षतेने करून घ्यावी. गाव, शहर, तालुका, जिल्हा व राज्यातील लोकसंख्येत अपंगांची निश्चित आकडेवारी पुढे आल्यास त्यांचे पुनर्वसन करण्यासाठीचा आराखडा करणे शासनाला सोपे जाईल.''
पाटोळे म्हणाले, ""अपंग व्यक्ती आजही उपेक्षित असून, त्यांच्यासाठीच्या योजनाही अद्याप त्यांच्यापर्यंत पोचलेल्या नाहीत. यासाठीच अपंग व्यक्तींनी पुढाकार घेऊन आपला लोकसंख्येतील सहभाग ठळकपणे शासनासमोर आणणे गरजेचे आहे.''