सकाळ वृत्तसेवा
०३ जुन २०११
वृषाली फाटक
पुणे, भारत
भिवंडीहून शस्त्रक्रियेसाठी पुण्यात आणलेल्या एका पाच वर्षांच्या बालकावर चुकीची शस्त्रक्रिया करण्याचा प्रकार पुणे महानगरपालिकेच्या कमला नेहरू रुग्णालयात घडल्याचे आज स्पष्ट झाले. या चुकीची जाणीव झाल्यानंतर संबंधित रुग्णालयाच्या डॉक्टरांनी या मुलावर पुन्हा शस्त्रक्रिया करण्याची तयारी दाखवली असल्याचेही समजले आहे.
आदर्श नीलेश यमून हा पाच वर्षांचा मुलगा हार्नियाच्या विकाराने आजारी होता. तो मूळचा भिवंडीचा राहणारा आहे. चांगले उपचार मिळतील म्हणून त्याच्या पालकांनी या मुलाला पुण्यात आणले. त्यांचे नातेवाईक पुण्यात भवानी पेठेत राहतात. त्यांच्या माध्यमातून या मुलाला पुण्यात कमला नेहरू रुग्णालयात चार दिवसांपूर्वी दाखल करण्यात आले. त्या ठिकाणी त्याच्या वैद्यकीय तपासण्या करण्यात येऊन या मुलावर हार्नियाची शस्त्रक्रिया करण्याचे निश्चित करण्यात आले. त्यानुसार या मुलावर काल (बुधवारी) शस्त्रक्रिया झाली.
मात्र, हार्नियाची शस्त्रक्रिया न करता या मुलावर भलतीच शस्त्रक्रिया केल्याचे नंतर उघड झाले. हा प्रकार परिसरात असलेले पतित पावन संघटनेचे कार्यकर्ते सुभाष जाधव, मुकुंद चव्हाण यांना समजला. आज दुपारी चव्हाण व अन्य कार्यकर्ते रुग्णालयात गेले. त्या वेळी डॉक्टरांची बैठक सुरू असल्याचे सांगण्यात आले. त्यानंतर सायंकाळी बैठक संपल्यानंतर रुग्णालयाच्या संबंधितांनी एक अहवाल आदर्शच्या पालकांच्या हाती दिला. त्यात "लघवीची जागा छोटी असल्याने त्यावर प्रथम शस्त्रक्रिया केली आहे,' अशा आशयाची नोंद केली आहे.
चव्हाण यांच्या म्हणण्यानुसार पालकांनी भिवंडीहून जो वैद्यकीय अहवाल आणला होता, त्यात केवळ हार्नियाचीच नोंद होती. पुण्यात आदर्शची सोनोग्राफी करण्यात आली त्यातही हार्नियाची शस्त्रक्रिया करावी लागणार असल्याचे स्पष्ट झाले होते. असे असतानाही हार्नियाची शस्त्रक्रिया सोडून डॉक्टरांनी दुसरीच शस्त्रक्रिया केल्याचे चव्हाण यांनी सांगितले. चव्हाण यांनी दिलेल्या माहितीनुसार "उद्या हार्नियाची शस्त्रक्रिया करू. तुम्ही कुठे जाऊ नका,' असे तेथील डॉक्टरांनी या मुलाच्या पालकांना सांगितले आहे.
दरम्यान, याबाबत पुणे महापालिकेचे आरोग्यप्रमुख डॉ. आर. आर. परदेशी म्हणाले, 'नीट माहिती दिली न गेल्याने संबंधितांचा गैरसमज झाला आहे. मुलावर शस्त्रक्रिया करणे सुरू असताना "फायमॉसिस"ची शस्त्रक्रिया करण्याची गरज डॉक्टरांना भासली म्हणून ती शस्त्रक्रिया प्रथम केली आहे. ती केली नसती तर मुलाला लघवी करणे अवघड झाले असते. हार्नियाची शस्त्रक्रिया उद्या केली जाणार आहे.''