सकाळ वृत्तसेवा
३० एप्रिल २०११
पुणे, भारत
'प्रतिजैविकांना प्रभावहीन ठरविणारी प्रतिकारशक्ती तयार होणे, ही गोष्ट क्षयरुग्णांसाठी घातक ठरत आहे. सरकारच्या "डॉट्स' या औषधाव्यतिरिक्त पर्यायी औषधांची तरतूद नसल्याने कित्येक क्षयरुग्णांना औषधाविनाच मृत्यूला सामोरे जावे लागत आहे. क्षयरुग्णांचे वाढते प्रमाण पाहता भविष्यातील हा मोठा धोका आहे,'' अशी माहिती ससून रुग्णालयातील क्षयरोग उपचार विभागाचे प्रमुख प्राध्यापक डॉ. एस. व्ही. घोरपडे यांनी दिली.
पुण्यात "सुपर बग' आढळून आल्याच्या पार्श्वभूमीवर "सकाळ'शी बोलताना त्यांनी ही माहिती दिली. ते म्हणाले, 'आपल्याकडे प्रतिलाख लोकसंख्येमागे क्षयरोगाचे 203 रुग्ण सापडतात. त्यातील तीन टक्के रुग्णांमध्ये औषधांविरोधी प्रतिकारशक्ती तयार झालेली असते. त्यामुळे त्यांना सध्याच्या पद्धतीपेक्षा वेगळी औषधे द्यावी लागतात. मात्र, सरकारी योजनेत त्याची तरतूद नाही. त्यामुळे या रुग्णांना ही औषधे बाहेरून आणावी लागतात. ज्यांना ती परवडत नाहीत, ते उपचारांपासून वंचित राहतात. अशा रुग्णांपासूनही इतरांना धोका होऊ शकतो. पूर्वी अशी पर्यायी औषधे देता येत होती. आता ही योजना केंद्र सरकारतर्फे राबविण्यात येत असल्याने राज्य सरकारने त्यावरील तरतूद बंद केली आहे. क्षयरोगाचा जीवनदायिनी योजनेत सहभाग केला, तर गरीब रुग्णांना त्याचा फायदा होऊ शकेल.''
प्रतिजैविकांसाठी राष्ट्रीय धोरण हवे
पुणे - 'प्रतिजैविकांच्या (अँटिबायोटिक्स) अनियंत्रित वापराचे दुष्परिणाम "सुपर बग'च्या रूपाने पुढे येत असून आता, यासाठी राष्ट्रीय पातळीवरच कडक धोरण आखण्याची गरज आहे. ही परिस्थिती कायम राहिली तर सध्या उपलब्ध असलेल्या सर्वच औषधांना प्रतिकार करू शकणारे विषाणू किंवा जिवाणू तयार होऊन आपल्या हातीच काहीच राहणार नाही,'' असे मत ससून रुग्णालयातील अधिष्ठाता व सूक्ष्मजीवशास्त्र विषयातील तज्ज्ञ डॉ. रेणू भारद्वाज यांनी व्यक्त केले.
डॉ. भारद्वाज म्हणाल्या, 'आपल्याकडे प्रतिजैविकांचा वापर वाढतो आहे. त्याच्या वापरावर फारसे निर्बंध नाहीत. रुग्ण थेट औषधाच्या दुकानातून अशी औषधे खरेदी करू शकतात. प्रतिजैविकांचा अति आणि चुकीचा वापर "सुपर बग'च्या निर्मितीचे प्रमुख कारण आहे. बऱ्याचदा डॉक्टरांना न विचारता रुग्ण जुन्या चिठ्ठीच्या आधारे पुन्हा पुन्हा अशी औषधे घेतात. तर कधी दिलेली औषधे आजार बरा होण्यापूर्वीच बंद करतात. अशा वेळी अर्धवट मेलेले जंतू स्वतःची प्रतिकारशक्ती निर्माण करतात आणि नंतर या औषधांना दाद देत नाहीत. त्यामुळे औषधनिर्मिती ते विक्री या सर्व पातळ्यांवर नियंत्रण ठेवणारे धोरण आखण्याची गरज आहे.''
अशी घ्यावी दक्षता...
- खाण्यापूर्वी हात स्वच्छ धुवावेत
- डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय औषधे घेऊ नयेत
- अर्ध्यावरच औषधे घेणे सोडू नये
- संसर्ग होणार नाही, याची काळजी घ्यावी
- डॉक्टरांनी अनावश्यक प्रतिजैविके देऊ नयेत
- दुभती जनावरे व कोंबड्यांसाठी प्रतिजैविकांचा वापर टाळावा
- रुग्णालयांत निर्जंतुकीकरणाची काळजी घ्यावी