ई सकाळ
०५ नोव्हेंबर २०११
हडपसर पुणे
संरक्षण दलातील उच्च पदावरील नोकरी सोडून कर्करुग्णांची सेवा करण्याचा वसा एका वृद्ध दाम्पत्याने जवळपास दीड तपांपासून घेतला आहे. या रुग्णांच्या असह्य वेदना...वेदनांमुळे होत असलेला तडफडाट ...कुटुंबातील वाढता ताणतणाव... अशा स्थितीत मदतीला धावून जाण्याचे काम हे दाम्पत्य करते. त्यांच्या धडपडीतून आत्तापर्यंत हजारो रुग्णांचे जीवन आनंदी व सुसह्य होण्यास मदत झाली आहे.
निवृत्त कर्नल एन. एस. न्यायपती (वय 68) व त्यांची पत्नी डॉ. माधुरी न्यायपती (वय 67) हे या दाम्पत्याचे नाव. कर्नल न्यायपती हे सेना दलात कर्नल होते. तर डॉ. माधुरी या सेनादलात वैद्यकीय अधिकारी होत्या. कर्नल न्यायपती यांच्या आईचे कर्करोगाने निधन झाले. तिच्या असह्य वेदना त्यांनी जवळून अनुभवल्या होत्या. त्यामुळे कर्करुग्णांची मोफत सेवा करण्याचा ध्यास त्यांनी घेतला. त्यांच्या या कार्यात त्यांच्या पत्नीनेही सहभाग दर्शविला आणि दोघांनीही स्वेच्छानिवृत्ती घेऊन या समाजकार्यास वाहून घेतले.
या कामासाठी 1993 मध्ये त्यांनी "केअर इंडिया मेडिकल सोसायटी'ची स्थापना केली. या माध्यमातून कर्करोगाचे लवकर निदान करून प्रतिबंधासाठी प्रयत्न सुरू झाले. सतसेवा प्रकल्प सुरू केला. या उपक्रमाद्वारा कर्करुग्णांच्या घरी जाऊन मोफत उपचार केले जातात. त्याच वेळी कुटुंबीयांचे समुपदेशनही केले जाते.
संस्थेने अत्यवस्थ कर्करुग्णांसाठी भवानी पेठेत विश्रांती नावाने रुग्णालय सुरू केले. रुग्णांसाठी वेदना निवारण व्यवस्थापन, अतिदक्षता विभाग, गरज पडल्यास मोफत शस्त्रक्रिया केल्या जातात. कर्नल न्यायपती म्हणाले, 'कर्करोगाने शरीर पोखरले असताना त्या व्यक्तीला जगण्याची नवीन उमेद मिळवून देण्यासाठी आम्ही रोज प्रयत्न करतो. रुग्णांच्या चेहऱ्यावरील आनंद पाहून "रुग्णसेवा हीच ईश्वरसेवा' मानून मी खारीचा वाटा उचलत आहे.''
डॉ. न्यायपती म्हणाल्या, ""दुर्देवाने मलादेखील जिभेचा कर्करोग झाला. या रुग्णांची सेवा केल्याने मी या रोगातून मुक्त झाले. त्यामुळे उर्वरित आयुष्य कर्करुग्णांची सेवा करण्यासाठीच घालविणार आहे. त्यागातील आनंदाची किंमत करता येत नाही.''