सकाळ वृत्तसेवा
०९ फ़ेबुवारी २०११
मुंबई, भारत
स्थापनेचे दशक अनोख्या पद्धतीने साजरे करण्याचा संकल्प खासगी क्षेत्रातील एचडीएफसीने सोडला आहे. इंडियन कॅन्सर सोसायटीच्या माध्यमातून देशभरातील लाखो कर्करुग्णांसाठी सहाय्यकारी ठरणारा डेब्ट फंड सादर करताना एचडीएफसीने खासगी क्षेत्रातील पहिला सामाजिक उपक्रम राबवला आहे.
10 डिसेंबर 1999 रोजी स्थापित एचडीएफसी म्युच्युअल फंड कंपनी आपली दशकपूर्ती सामाजिक बांधिलकीतून करीत असल्याचे नमूद करून एचडीएफसी समूहाचे अध्यक्ष दीपक पारेख यांनी आज या उपक्रमाची येथे घोषणा केली. म्युच्युअल फंड कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक मिलिंद बर्वे हेही या वेळी उपस्थित होते. लाखो कर्करुग्णांच्या उपचाराला सहाय्यभूत ठरणाऱ्या नव्या डेब्ट फंडाच्या सादरीकरणाप्रसंगी "इंडियन कॅन्सर सोसायटी'चे मानद अध्यक्ष निहाल कविरत्ने आणि मानद सरचिटणीस डॉ. अरुण कुरकुरे हेही उपस्थित होते.
एचडीएफसीसी नावाचा हा फंड येत्या 18 फेब्रुवारी रोजी खुला होत असून 4 मार्च रोजी बंद होत आहे. तीन वर्षांच्या मुदतीच्या या फंडासाठी किमान गुंतवणूक एक लाख रुपये असून या फंडासाठी अतिरिक्त कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही. तसेच या फंडातील गुंतवणुकीवर मिळणारा परतावा (लाभांश, व्याज) हा कर्करुग्णांच्या देणगीस पात्र ठरेल. यानुसार गुंतवणूकदार संपूर्ण अथवा अर्धी रक्कम देणगी देऊ शकतील.
एचडीएफसीने या योजनेसाठी यापूर्वीच आघाडीच्या खासगी कंपन्यांचे योगदान घेण्याचे ठरवले आहे; तर खुद्द कंपनी 10 कोटी रुपयांचे सहाय्य करणार आहे. देशातील दुसरी मोठी म्युच्युअल फंड कंपनी असलेल्या एचडीएफसीची डिसेंबरमधील मालमत्ता 88 हजार कोटी रुपयांपेक्षा अधिक आहे. कंपनीचे 44 लाखांहून अधिक ग्राहक आहेत.
10 टक्के कर्करुग्ण मुलांवरच उपचार
भारतात 50 हजार मुलांना कर्करोग झाल्याचे निदर्शनास आले असले, तरी अवघ्या 5 हजार कर्करुग्ण मुले ही अंतिम उपचारापर्यंत पोहोचू शकतात, असे इंडियन कॅन्सर सोसायटीचे मानद सचिव डॉ. अरुण कुरकुरे यांनी सांगितले. कर्करुग्णांच्या उपचारासाठी 2 ते 12 लाख रुपयांपर्यंत खर्च होत असल्याची माहिती देतानाच यासाठी 2 महिने ते 2 वर्षाचा कालावधीही लागतो, असेही डॉ. कुरकुरे यांनी सांगितले. इंडियन कॅन्सर सोसायटीच्या परळ येथील पुनर्वसन केंद्रात कर्करुग्णांच्या हाताला काम देण्याबरोबरच त्यांची उपचारोत्तर काळजी घेण्याचेही कार्य केले जाते. येथे त्यांना दिवसाला 30 ते कमाल 100 रुपये प्राप्त होतात; तर 85 ते 100 कर्करुग्ण मुलांसाठी येथे योग्य सुविधा आहेत.