Print
Hits: 2627

सकाळ वृत्तसेवा
०५ ऑक्टोबर २०११
मुंबई , भारत

अहमदाबादमधील साणंद येथील मेसर्स प्रियल फार्मा या कंपनीविरोधात खटला भरण्याचे आदेश महाराष्ट्राचे अन्न आणि औषध प्रशासन (एफडीए) आयुक्त महेश झगडे यांनी काढले आहेत. या कंपनीच्या "ऍझिथ्रोमायसिन' या बाळांसाठी असलेल्या औषधात प्रतिजैविके अजिबात (शून्य टक्के) नसल्याचे तपासणीत आढळून आल्याने हे औषध धोकादायक असल्याचे ठरवत एफडीएने औरंगाबादमध्ये त्याचा साठा जप्त केला. त्यानंतर या कंपनीविरोधात 1940च्या औषध आणि सौंदर्य प्रसाधने कायद्याखाली गुन्हा दाखल करून खटला भरण्याचे आदेश आम्ही दिले, अशी माहिती आयुक्त झगडे यांनी "सकाळ'ला दिली.

हे औषध श्‍वसनमार्गाचा जंतूसंसर्ग रोखण्यासाठी बाळाला दिले जाते. मात्र, प्रतिजैविकांचा घटक नसलेले हे औषध एखाद्या बाळाला दिले तर त्याचा आजार बळावून प्रसंगी त्याच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे असे औषध धोकादायक ठरते, असे एफडीएच्या सूत्रांनी सांगितले.

एफडीएचे औरंगाबादमधील औषध निरीक्षक र. मा. बजाज यांनी "ऍझिथ्रोमायसिन ओरल सस्पेन्शन आय. पी.' (ऍझिरोस-200) या औषधाच्या 1 ऑक्‍टोबर 2010 ते 31 सप्टेंबर 2012 या कालावधीपर्यंत वैध असलेल्या साठ्यातील नमुन्याचे विश्‍लेषण केले. त्यात औषधातील आवश्‍यक घटक असलेले प्रतिजैविक अजिबात नसल्याने ते बनावट आणि धोकादायक असल्याचा निष्कर्ष काढण्यात आला. त्यामुळे या औषधांच्या 226 बाटल्यांचा साठा जप्त करण्यात आला, असे सूत्रांनी सांगितले.

आयुक्तांनी या प्रकरणी उत्पादकांविरुद्ध फसवणूक आणि धोकादायक औषध विक्रीप्रकरणी खटला भरण्याचे आदेश संबंधित अधिकाऱ्यांना दिले आहेत (कायद्यानुसार, या गुन्ह्याबद्दल उत्पादकाला कमाल दहा वर्षांची शिक्षा होऊ शकते). या कंपनीचा संबंधित औषधाचा साठा सरकारी रुग्णालयांनी वापरू नये तसेच औषध दुकानदारांनी त्याची विक्री करू नये आणि या औषधाचा साठा कुठेही आढळून आल्यास त्याची माहिती तात्काळ एफडीएला द्यावी, अशी सूचनाही आयुक्तांनी जारी केली आहे.

महाराष्ट्रात औरंगाबाद आणि इचलकरंजीमध्ये या औषधाचा पुरवठा झाल्याची माहिती आम्हाला मिळाली आहे. त्यामुळे इचलकरंजीमध्येही आमच्या पथकांकडून कारवाई सुरू आहे. त्याशिवाय गुजरात सरकारलाही या कंपनीची चौकशी करण्यासाठी आम्ही कळवले असल्याचे झगडे यांनी सांगितले.

Disclaimer: The news story on this page is the copyright of the cited publication. This has been reproduced here for visitors to review, comment on and discuss. This is in keeping with the principle of ‘Fair dealing’ or ‘Fair use’. Visitors may click on the publication name, in the news story, to visit the original article as it appears on the publication’s website.