सकाळ वृत्तसेवा
०७ फ़ेबुवारी २०११
पुणे, भारत
"महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठातर्फे ऍलोपॅथीप्रमाणेच आयुर्वेदाची सिद्धता साध्य करणारा प्रकल्प हाती घेण्यात येणार आहे. एका विकारासाठी नेहमीच्या औषधांबरोबरच दुसरे आयुर्वेदिक औषध देण्यासाठीचे संशोधन या प्रकल्पामध्ये अंतर्भूत आहे,'' असे प्रतिपादन महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. अरुण जामकर यांनी शनिवारी सांगितले.
"राष्ट्रीय शिक्षण मंडळ' आणि "असोसिएशन ऑफ एनेस्थेसिऑलॉजिस्ट ऑफ इंडियन मेडिसीन'तर्फे "संज्ञाहरण' विषयावर आयोजित अधिवेशनाचे उद्घाटन डॉ. जामकर यांच्या हस्ते झाले. संस्थेचे अध्यक्ष डॉ. विजय डोईफोडे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. डॉ. डी. पी. पुराणिक, डॉ. डी. एन. पांडे, टिळक आयुर्वेद महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. तनुजा नेसरी, अधिवेशनाचे सचिव डॉ. नंदकिशोर बोरसे, डॉ. आर. एन. गांगल या वेळी उपस्थित होते.
डॉ. जामकर म्हणाले, ""या प्रकल्पासाठी पुणे आणि नाशिक येथील प्रत्येकी सहा आयुर्वेदिक महाविद्यालय आणि त्याच्याशी संलग्न असलेले रुग्णालय यांची निवड करण्यात आली आहे. त्यांना "क्लिनिकल रिसर्च साईटस'चा दर्जा देण्यात येणार असून माहितीचे संकलन करण्यात येणार आहे. फार्मा लॅब, संशोधन पद्धती, स्टॅटिस्टिशियन यांच्या मदतीने संशोधन पूर्णत्वास नेण्यात येणार आहे. यातील प्रत्येक "ट्रायल'ला "आयुष' विभागातर्फे 30 लाख रुपयांचे अनुदान मिळणार आहे.''
"संस्कृतमध्ये ग्रंथसंपदा असल्यामुळे 70 टक्के आयुर्वेद समाजापर्यंत पोचलेला नाही. त्यामुळे संस्कृतच्या अभ्यासकांना आयुर्वेद क्षेत्रात अध्ययन करण्यासाठी प्रोत्साहन दिले पाहिजे,' असे सांगून ते म्हणाले, ""आयुर्वेदाची प्रॅक्टिस करणाऱ्यांपैकी 15 टक्के डॉक्टरदेखील वैयक्तिक जीवनामध्ये आयुर्वेदाचा उपयोग करत नाहीत. आपल्या उपचार पद्धतीवर विश्वास ठेवण्याची आवश्यकता आहे. प्राथमिक काळजी आणि रोग निवारण यासाठी सर्व संसाधनांसह पूर्ण क्षमतेने वापर करण्याची गरज आहे.''
या वेळी डॉ. पांडे, डॉ. पुराणिक आणि डॉ. डोईफोडे यांनी मनोगत व्यक्त केले. डॉ. गांगल यांनी प्रास्ताविक केले. डॉ. बोरसे यांनी आभार मानले.