सकाळ वृत्तसेवा
२९ मार्च २०११
मुंबई, भारत
शहर आणि उपनगरात ठिकठिकाणी सुरू असलेल्या विविध प्रकारच्या बांधकामामुळे हवेतील धूलिकणांच्या प्रमाणात प्रचंड वाढ झाल्याने अस्थमा, ब्रॉंकायटीससारख्या श्वसनविकारांच्या रुग्णांचा जीव गुदमरू लागला आहे. विशेष म्हणजे वायुप्रदूषणाने सर्वसाधारण पातळी ओलांडल्याने श्वसन विकारांच्या रुग्णांमध्ये वाढ झाल्याचे तज्ज्ञ डॉक्टरांचे म्हणणे आहे.
मुंबई शहरात मोनोरेल, इमारतींची दुरुस्ती आणि पुनर्विकास, झोपडपट्टी पुनर्वसन योजनेतील इमारत बांधणी, उड्डाणपुलांचे बांधकाम; तर उपनगरात मेट्रो रेल्वे, इमारतींची उभारणी, रस्तेदुरुस्ती आदी बांधकामे मोठ्या प्रमाणावर सुरू आहेत. या बांधकामामुळे प्रचंड प्रमाणावर धूळ निर्माण होत असून हवेतील धूलिकणांच्या प्रमाणाने धोक्याची पातळी ओलांडली आहे. याचा विपरीत परिणाम पर्यावरणावर तर होत आहेच; परंतु त्यामुळे मुंबईकरांचे आरोग्यही धोक्यात आले आहे. गेल्या काही वर्षांत मुंबईतील वायुप्रदूषणात खूप वाढ झाली आहे. महापालिकेने 2008-9 या वर्षात मुंबईतील वरळी, खार, अंधेरी, भांडुप, बोरिवली या ठिकाणी पाहणी केली होती. त्यावेळी हवेतील नायट्रोजन व धूलिकणांची पातळी बोरिवली वगळता सर्वच सर्वेक्षण केंद्रांवर मानकांपेक्षा अधिक असल्याचे आढळून आले होते.
शरीराला ऑक्सिजनची गरज अन्नापेक्षा दहापटीने जास्त असते. आपण शरीरात घेत असलेल्या हवेत ऑक्सिजनबरोबरच इतर अपायकारक घटकही असतात. त्यामुळे मुंबईसारख्या वायुप्रदूषणाचे प्रमाण अधिक असलेल्या शहरातील लोकांच्या आरोग्यावर त्याचे दुष्परिणाम होतात. मुंबईत गेल्या दोन वर्षात मेट्रो रेल्वे, मोनोरेल, इमारती आणि पुलांच्या बांधकामांमुळे अस्थमाच्या रुग्णसंख्येत 30 टक्क्यांनी वाढ झाल्याचे डॉ. प्रमोद निफाडकर यांनी सांगितले. नव्या रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. त्याचबरोबर बरे होण्याच्या मार्गावर असलेल्या जुन्या रुग्णांची प्रकृतीही पुन्हा ढासळताना दिसून येत आहे. सध्या मुंबईमध्ये 10 ते 12 लाख अस्थमाचे रुग्ण आहेत, अशी माहितीही त्यांनी दिली.
उपाययोजना आवश्यकच
पाश्चात्य देशांमध्ये बांधकाम सुरू असताना धूळ किंवा बांधकाम सुरू असताना होणारा आवाज बाहेर जाऊ नये म्हणून संरक्षक कवच उभारण्यात येते. आपल्या देशात मात्र याबाबतीत बेफिकिरी दिसून येते. परंतु अस्थमाच्या वाढत्या रुग्णांची संख्या लक्षात घेता बांधकामाच्या ठिकाणी पाश्चात्य देशांप्रमाणे उपाययोजना करण्याची गरज आहे. किंबहुना अशा प्रकारची उपाययोजनै बंधनकारक करणे आवश्यक आहे, अशी सूचना डॉ. निफाडकर यांनी केली.
काय खबरदारी घ्याल?
- बांधकाम सुरू असलेल्या बाजूकडच्या खिडक्या आणि दरवाजे शक्यतो बंद ठेवावेत.
- धूळ जास्त असलेल्या ठिकाणी काम करणे टाळावे किंवा अत्यावश्यक असेल तर मास्क घालावा.
- श्वसनसंस्थेच्या आरोग्यासाठी प्राणायाम, फुफ्फुसांचे व्यायाम करावेत.
- पाणी भरपूर प्यावे. ऍन्टी-ऑक्सिडन्ट म्हणून फळे, हिरव्या पालेभाज्या यांचा आहारात वापर करावा.