Print
Hits: 3464

सकाळ वृत्तसेवा
२२ सप्टेंबर २०११
ठाणे, भारत
म्हतारपण म्हणजे आयुष्याची कातरवेळ विज्ञान युगातल्या गोळ्या-औषधांनी काहीशी लांबविली असली तरी संध्याछायेची भीती अनेकांच्या मनात दाटलेली असते. स्मृतिभ्रंश (अल्झायमर) हा आजार आयुष्याची संध्याकाळ काळीकुट्ट करीत असून म्हतारपण पोखरू लागलाय. संपूर्ण देशात लोकसंख्येच्या तीन टक्के म्हणजे 37 लाख ज्येष्ठ नागरिक अल्झायमरने त्रस्त आहे. 21 लाख स्त्रिया आणि 15 लाख पुरुष असे हे प्रमाण आहे. महाराष्ट्रही यात आघाडीवर असून आजघडीला तीन लाख 60 हजार जण या रोगाने बाधित आहेत. प्रगत आणि अप्रगत देशांतील बदलत्या जीवनशैलीने अल्झायमरग्रस्त वृद्धांची संख्या लक्षात घेऊन 1994 पासून 21 सप्टेंबर हा दिवस "वर्ल्ड अल्झायमर डे' म्हणून साजरा केला जाऊ लागला. या निमित्ताने मुंबई आणि ठाण्यात कार्यरत असलेल्या सिल्व्हर इनिंग फाऊंडेशनने 2 सप्टेंबरपासून अल्झायमरच्या जागृतीसाठी विविध कार्यक्रम आयोजित केले आहे. 27 सप्टेंबरपर्यंत ते सुरू राहणार आहेत.

जागतिक बॅंकेच्या सहकार्याने सिल्व्हर इनिंग फाऊंडेशन आणि अल्झायमर ऍण्ड रिलेटेड डिसऑर्डर सोसायटी ऑफ इंडिया (एआरडीएसआय) यांनी संयुक्तरीत्या ज्येष्ठांच्या केलेल्या पाहणीनुसार दर पाच वर्षांनी अल्झायमरग्रस्तांची संख्या दुप्पट होत असल्याचे आढळून आले आहे. महाराष्ट्रात 2006 मध्ये दोन लाख सात हजार ज्येष्ठ नागरिक अल्झायमरने त्रस्त होते. आतापर्यंतच्या आकडेवारीनुसार 2011 मध्ये सुमारे तीन लाख 60 हजार ज्येष्ठांना अल्झायमरने ग्रासले आहे. जगात दर सातव्या सेकंदाला एक याप्रमाणे ज्येष्ठांना अल्झायमरची लागण होते आहे. प्राप्त सर्वेक्षणानुसार या संस्थांनी भविष्यातल्या या आजाराचा धोकाही अहवालात वर्तविला आहे. 2016 पर्यंत या आजाराची सर्वाधिक म्हणजे 200 टक्के लागण दिल्ली, झारखंड आणि दिल्ली राज्यांमध्ये होणार आहे. याशिवाय महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, राजस्थान, तामिळनाडू, पश्‍चिम बंगाल, आंध्र प्रदेश, मध्य प्रदेश, छत्तीसगड, कर्नाटक, आसाम आदी राज्यांतल्या अल्झायमरग्रस्त रुग्णांच्या संख्येत 100 टक्‍क्‍यांनी वाढ होण्याचा धोक्‍याचा निर्देशही या संस्थांनी निर्दशनास आणून दिला आहे.

वृद्धांनी सेवानिवृत्तीनंतर रिकामे न बसता "शब्दकोडे' सोडविण्यासारख्या स्मृतींना व्यायाम देणाऱ्या कृती करत राहिले पाहिजे. स्वतःला व्यस्त ठेवावे, असा सल्ला ठाणे प्रादेशिक मनोरुग्णालयाचे अधीक्षक डॉ. संजय कुमावत यांनी दिला आहे.

धोरणात समावेश व्हावा
अल्झायमर आजाराचा धोका ओळखून सिल्व्हर इनिंग फाऊंडेशन आपल्या सर्वेक्षणाचा अहवाल केंद्र आणि राज्य सरकारकडे पाठविला आहे. राज्य सरकार लवकरच वृद्धांसाठी सर्वंकष धोरण जाहीर करणार आहे. त्यात या आजारासाठी आर्थिक तरतुदीचा आणि जनजागृतीचा गांभीर्यीने विचार व्हावा, अशी मागणी सिल्व्हर इनिंग फाऊंडेशनने मुख्य सचिव रत्नाकर गायकवाड आणि समाजकल्याण विभागाचे सचिव दिनेश वाघमारे यांच्याकडे केली असल्याचे माहिती फाऊंडेशनचे संस्थापक शैलेश शर्मा यांनी दिली.

काय आहे आजार?
अल्झायमर हा स्मृतिभ्रंशाचा आजार आहे. यामुळे स्वभावात बदल होतो. त्याचा परिणाम ज्येष्ठांच्या वर्तणुकीवर होतो. निद्रानाश आणि भूक न लागणे असे प्रकार घडतात. नातेवाईकांची ओळख विसरणे, रस्ता चुकणे, चिडचिड करणे आदी गोष्टी ज्येष्ठांच्या बाबतीत घडतात. कधी कधी यामुळे ते हिंसकही होऊ शकतात. कामभावनेवरील नियंत्रण सुटते, अशी लक्षणे दिसतात. मेंदूतील स्मृतिकेंद्रावर ऍम्लॉईड प्रोटिनच्या हल्ल्याने अल्झायमर होतो.

Disclaimer: The news story on this page is the copyright of the cited publication. This has been reproduced here for visitors to review, comment on and discuss. This is in keeping with the principle of ‘Fair dealing’ or ‘Fair use’. Visitors may click on the publication name, in the news story, to visit the original article as it appears on the publication’s website.