सकाळ वृत्तसेवा
१६ मे २०११
कल्याण, भारत

अपंगांची सेवा मनाला मोठे समाधान देणारी आहे. त्यांच्यातील दुःख जाणून घेऊन त्यांच्यामध्ये आत्मविश्वास निर्माण करणे, त्यांना प्रेरणा देणे हे अत्यंत महत्त्वाचे आहे, असे उद्गार प्रसिद्ध अभिनेते शत्रुघ्न सिन्हा यांच्या पत्नी व ज्येष्ठ अभिनेत्री पूनम सिन्हा यांनी येथे काढले.
येथील सेंच्युरी रेऑन शाळेच्या प्रांगणात अपंगांसाठी काम करणाऱ्या नागपूरच्या "उद्धार' संस्थेतर्फे तीन दिवस मोफत जयपूर फूट आणि कॅलिपर्स शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिराचे उद्घाटन सिने अभिनेत्री सिन्हा यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी त्यांनी वरील उद्गार काढले. त्या म्हणाल्या की, मी आणि माझे पती यांना सामाजिक कामाचा ओढा आहे. बिर्ला कंपनीची मी इन हाऊस मॉडेल होते. कुंजबिहारी अग्रवाल यांनी अपंग सेवेचा जो यज्ञ सुरू ठेवला आहे. तो समाजातील सगळ्याच व्यक्तींना प्रेरणादायी ठरो, अशी भावना अभिनेत्री सिन्हा यांनी व्यक्त केली. याप्रसंगी या शिबिराचे आयोजक कुंजबिहारी अग्रवाल, त्यांच्या पत्नी कुमकुम अग्रवाल, सेंच्युरी रेऑन कंपनीचे अध्यक्ष ओमप्रकाश चितलांगे आदी मान्यवर उपस्थित होते. चितलांगे यांनी अपंगांना आत्मबळ जागृत करण्याचा सल्ला दिला; कुंजबिहारी अग्रवाल यांनी सांगितले की, अपंगत्व हे अपघाताने येते किंवा जन्मजात असते. काही लोकांना मधुमेहाचा त्रास असल्याने एखादी जखम मोठी झाल्यावर त्यांच्या शरीरातील अवयव कापावा लागतो. या शिबिराचे वैशिष्ट्य म्हणजे शिबिरात येणाऱ्या अपंगांना जयपूर फूट तयार करून देणारेही अपंग आहेत. त्यामुळे त्यांची या कामातील भावनिक गुंतवणूक ही आमच्यापेक्षाही मोठी आहे. जयपूर फूट जागेवर तयार करून देणाऱ्या या मंडळाचे 12 महिन्यांपैकी 10 महिने हे देशभरात शिबिरे घेण्यात जातात. हे काम ते मोठ्या आनंदाने करतात. तीन दिवस चालणाऱ्या या शिबिरात आतापर्यंत 180 जणांनी नोंदणी केली आहे. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अनिल व्यास यांनी केले.