सकाळ वृत्तसेवा
१७ मे २०११
नांदेड, भारत
स्वतः अंध असूनही अंधत्व हे अपंगत्व न मानता त्याचा आव्हान म्हणून स्वीकार केलेल्या एका संगणक अभियंत्याने अंध बुद्धिबळपटूंना प्रशिक्षण देणारे जगातील पहिले "सॉफ्टवेअर' तयार केले आहे. चारुदत्त विठ्ठलराव जाधव असे या संगणक अभियंत्याचे नाव असून त्यांनी तयार केलेल्या या "सॉफ्टवेअर'मुळे जागतिक पातळीवरील अंध बुद्धिबळपटूंना वरदान मिळाले आहे.
दरम्यान, गोव्यात 2003 मध्ये झालेल्या जागतिक पातळीवरील अंधांच्या बुद्धिबळ स्पर्धेच्या वेळी तत्कालीन राष्ट्रपती डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या हस्ते या "सॉफ्टवेअर'चे लोकार्पण झाले होते.
मुंबई येथील टाटा कन्सलटंसी कंपनीत कार्यरत असलेले चारुदत्त जाधव यांनी अंधांना बुद्धिबळ खेळण्यासाठी उपयुक्त ठरलेले जगातील पहिले बोलणारे "स्पीचेबल सॉफ्टवेअर' तयार केले. "ग्लोबल फाउंडेशन' या कंपनीच्या आर्थिक सहकार्याने चारुदत्त जाधव यांनी पाश्चिमात्य देशांच्या संगणक अभियंत्यांनाही थक्क करून सोडणारे "सॉफ्टवेअर' तयार केले आहे. समाज विकसित होण्यासाठी ज्या क्षमतांची गरज असते त्या सर्व क्षमता बुद्धिबळपटूंमध्ये असतात. पर्यायाने समाज विकासाचे अनन्यसाधारण कार्य बुद्धिबळपटू करत असतात, असे चारुदत्त जाधव यांचे म्हणणे आहे. चारुदत्त जाधव यांने तयार केलेल्या या "सॉफ्टवेअर'चा प्रमुख उद्देश अंध बुद्धिबळपटूंना मुख्य प्रवाहात आणणे हा आहे. भारतीय अंध बुद्धिबळपटू कोणत्याही क्षेत्रात कमी पडू नये, हा उदात्त हेतू समोर ठेवून आपण हे सॉफ्टवेअर तयार केल्याचे चारुदत्त यांनी "सकाळ'ला सांगितले.
या "सॉफ्टवेअर'मध्ये चारुदत्त यांनी अशा सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत, की याचा योग्य उपयोग करून अंध बुद्धिबळपटू डोळस बुद्धिबळपटूसमोर आव्हान उभे करू शकतो व त्यावर मातही करू शकतो. या "सॉफ्टवेअर'च्या "ओपनींग मेनू'मध्ये तीन स्तरावर प्रशिक्षणाची व्यवस्था आहे. प्रारंभ, माध्यम व प्रगत अशा तीन स्तरावर या "सॉफ्टवेअर'तर्फे संगणकाद्वारे बुद्धिबळाचे प्रशिक्षण घेता येते. जगातील हे पहिले बोलणारे (स्पीचेबल) "सॉफ्टवेअर' असल्यामुळे प्रत्येक बाबींची माहिती अंध बुद्धिबळ प्रशिक्षणार्थीला मिळते. संगणकासोबत तीन स्तरावर प्रारंभ, मनोरंजन व उच्च स्पर्धात्मक स्तर अशा तीन स्तरावर संगणकासोबत बुद्धिबळ खेळण्याची सुविधा या "सॉफ्टवेअर'मध्ये आहे. प्रतिस्पर्ध्याची प्रत्येक चाल, त्याचा होणारा परिणाम व त्याच्या चालीसाठी प्रतिचाल कोणती असावी, या सर्वांची एका क्षणात माहिती संगणकाद्वारे बुद्धिबळपटूंना मिळू शकते. आपण खेळलेल्या सामन्यातील चुका; तसेच योग्य बाबी याची माहिती संगणक देत असतो, या वेळी संगणक खेळणाऱ्या बुद्धिबळपटूशी थेट संवाद साधतो, चाल चालण्यास उशीर झाल्यास झोप लागली का, म्हणूनही विचारतो. चुकीच्या चालीवर मोठ्याने हसतो, टोमणेही मारतो. याच "सॉफ्टवेअर'मध्ये आंतरराष्ट्रीय व जागतिक पातळीवरील एक लाख सामने संकलित करण्यात आले आहेत. सर्व सामन्यांची सुरवात ते शेवटच्या चालीपर्यंत समालोचनासहीत माहिती उपलब्ध आहे. विशेष म्हणजे रशियाच्या जगजेत्ता अलकाईनपासून ते आजच्या भारताचा ग्रॅंडमास्टर विश्वनाथन आनंदचे सर्व सामने या "सॉफ्टवेअर'मध्ये उपलब्ध आहेत. या जागतिक विजेत्या बुद्धिबळपटूसोबत खेळण्याची संधीही हा "सॉफ्टवेअर' उपलब्ध करून देतो. "ग्लोबल फाउंडेशन'च्या के. व्ही. शेषाद्री व मनोज तिरोडकर यांच्या सहकार्याने तयार केलेले हे "सॉफ्टवेअर ग्लोबल फाउंडेशन'तर्फे अंध बुद्धिबळपटूंना व प्रशिक्षकांना मोफत उपलब्ध करून देत असल्याचे चारुदत्त यांनी "सकाळ'शी बोलताना सांगितले.
टाटा कन्सलटन्सीमध्ये डोळस अन्य उमेदवारांसारखी मुलाखत देऊन त्यांनी नोकरी प्राप्त केली. त्यांचे आई-वडील मुंबईत गिरणी कामगार होते. गिरण्या बंद पडत गेल्याने त्यांचा हा उपजिवेकेचा आधारही गेला. चारुदत्त यांनाही कुटुंबाला हातभार लावण्यासाठी बालवयात मजुरी करावी लागली. 1997 पर्यंत जागतिक पातळीवरील बुद्धिबळ स्पर्धा गाजविल्यानंतर चारुदत्त यांनी आपल्या आयुष्यात आलेले दुःख व हलाखीचे अनुभव देशातील इतर अंध बंधूंना येऊ नयेत, यासाठी वेगवेगळ्या उपक्रमाद्वारे बुद्धिबळाचे प्रशिक्षण देऊन अंध विद्यार्थ्यांना सक्षम करण्याचा प्रयत्न सुरू केला आहे.
राज्यातील अनेक विद्यापीठांनी संगणक प्रशिक्षण पदवी अभ्यासक्रमात चारुदत्त यांना सक्षम विद्यार्थ्यांसोबत प्रवेश देणे नाकारले होते. चारुदत्त यांनी त्यावर राष्ट्रपतींना पत्र लिहून शिक्षणाच्या मूलभूत हक्कापासून आपल्याला वंचित ठेवले जात असल्याचे निदर्शनास आणून दिले होते. राष्ट्रपतींच्या आदेशावरून चारुदत्त यांना विद्यापीठात प्रवेश देण्यात आला. चारुदत्तने त्या अभ्यासक्रमामध्ये विद्यापीठात सर्वप्रथम येण्याचा बहुमान पटकाविला होता.