सकाळ वृत्तसेवा
१७ मे २०१०
पुणे, भारत
होमिओपॅथीवर आधारलेला पहिला मराठी चित्रपट "अमर आदित्य प्रॉडक्शन' निर्मिती आणि योगेश गोसावी दिग्दर्शित "प्रतिसाद.. द रिस्पॉंन्स' हा पुण्यासह संपूर्ण महाराष्ट्रात पुढील शुक्रवारी (ता. 28) प्रदर्शित होत आहे. हा चित्रपट रुग्ण - डॉक्टर यांच्या नातेसंबंधावर व होमिओपॅथी या व्यवसायावर भाष्य करतो. हा चित्रपट जागतिक ख्यातीचे होमिओपॅथी डॉक्टर अमरसिंह निकम यांच्या अनुभवांवर बेतलेला असून, संकल्पना व पटकथा त्यांनी स्वतःच लिहिलेली आहे.
लोकप्रिय अभिनेते संदीप कुलकर्णी यांनी या चित्रपटात डॉ. आदित्य यांची भूमिका साकारली असून, ती डॉ. निकम यांच्याशी साधर्म्य साधणारी आहे. "श्वास चित्रपटात साकारलेल्या डॉक्टरच्या भूमिकेनंतर मला, डॉक्टरच्या भूमिका असलेल्या 5-6 चित्रपटांचे प्रस्ताव आले, पण त्या भूमिका इतक्या प्रभावी न वाटल्याने त्या मी स्वीकारल्या नाही. शिवाय मला टाइप कास्ट व्हायचे नव्हते. रुग्ण व डॉक्टर यांच्यातील रिलेशन जपणाऱ्या डॉ. आदित्यची भूमिका मला वेगळी व आव्हानात्मक वाटली; म्हणूनच "प्रतिसाद… द रिस्पॉंन्स' मी स्वीकारला," असे संदीप कुलकर्णी यांनी डॉक्टरांच्या कार्यक्रमात बोलताना सांगितले.
या चित्रपटात संदीप कुलकर्णी यांच्यासोबत महत्त्वाच्या भूमिकेत वावरणारे कलावंत किशोर कदम या कार्यक्रमात बोलताना म्हणाले, ही माझी भूमिका अतिशय वेगळी असून, संदीप कुलकर्णी, नीलम शिर्के यांच्यासोबत काम करताना वेगळा अनुभव देऊन गेला. ही भूमिका साकारण्यासाठी डॉ. निकम यांची विशेष मदत झाली.
होमिओपॅथीवर आधारित असलेल्या या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी पुण्यातील डॉक्टर उत्स्फूर्त मदत करीत असून, या चित्रपटाच्या प्रचारासाठी ते विविध कार्यक्रमांचे आयोजन करीत आहेत. नुकताच पुण्यातील भारतीय विद्यापीठात एक भव्य कार्यक्रम आयोजित करून त्याची मुहूर्तमेढ रोवण्यात आली असल्याचे "पीसीडीएमपीए'चे अध्यक्ष डॉ. राजेंद्र जगताप व सेक्रेटरी डॉ. विजय वरदे यांनी घोषित केले. या चित्रपटाचे प्रमोशन आपल्या क्लिनिक, हॉस्पिटल व मेडिकल कॉलेजमध्येही करावे, असे जाहीर आवाहन त्यांनी या प्रसंगी बोलताना उपस्थित डॉक्टरांना केले. या चित्रपटाच्या निर्मितीमुळे डॉक्टरांनी रुग्ण व त्यांचे नातेवाईक यांच्याशी संवाद कसा साधावा, याची उकल होत असल्याने हा चित्रपट रुग्ण व डॉक्टर यांच्यामधला दुवा असेल, असेही ते पुढे बोलताना म्हणाले.
28 मे रोजी महाराष्ट्रात प्रदर्शित होणाऱ्या "प्रतिसाद.. द रिस्पॉंन्स' या चित्रपटाचा आस्वाद रसिकांनी चित्रपटगृहातच घ्यावा, असे मनोगत निर्माते डॉ. विजयसिंह अमरसिंह निकम यांनी व्यक्त केले.
होमिओपॅथी 'डॉक्टर' देत आहेत प्रतिसाद!
- Details
- Hits: 3220
0