सकाळ वृत्तसेवा
१७ जून २०१०
मुंबई, भारत
मातृत्वाचा आनंद प्रत्येक स्त्रीला हवा असतो, तिचा तो नैसर्गिक हक्कच असतो. मात्र, वंध्यत्वामुळे मातृत्वसुखापासून वंचित राहिलेली काही जोडपी आयव्हीएफ तंत्रज्ञानासारखा अत्याधुनिक पर्याय स्वीकारतात. त्यानुसार नुकताच मातृत्वाचा आनंद घेतलेल्या 66 वर्षीय मातेचा निर्णय योग्य की अयोग्य, या प्रश्नावर "गायनॉकॉलॉजी वर्ल्ड'च्या अध्यक्ष डॉ. धुरू शहा यांनी आज आपली भूमिका पत्रकार परिषद घेऊन स्पष्ट केली. मातृत्व मिळणे हा जसा मातेचा अधिकार असतो, तसेच जन्माला येणाऱ्या अर्भकास उत्तम आरोग्य, स्वास्थ्य व जन्मदात्यांचा अधिकाधिक सहवास लाभणे हीदेखील तितकीच महत्त्वाची निकड असते. त्यामुळे उतारवयात आयव्हीएफ तंत्रज्ञानाचा अयोग्य वापर करून, मुलास जन्म देणे वैद्यकीय आणि नैतिकदृष्ट्या योग्य नसल्याचे ठाम मत त्यांनी आज व्यक्त केले.
डॉ. शहा यांनी 30 हून अधिक वर्षे आयव्हीएफ तंत्रज्ञानाच्या विधायक वापराने अपत्य नसणाऱ्या अनेक दाम्पत्यांना मातृ-पितृसुखाचा आनंद मिळवून दिला आहे. मात्र, मागील काही वर्षांमध्ये या तंत्रज्ञानाचा वापर अत्यंत यांत्रिक पद्धतीने होत आहे, असे त्यांना वाटते. केवळ मूल हवे म्हणून अनेक समलिंगी जोडपी, वयोवृद्ध जोडपी अट्टहासाने या तंत्रज्ञानाकडे वळतात. परदेशांतून अनेक जोडपी भारतात येऊन भारतीय महिलांची गर्भाशये भाड्याने घेऊन मुलांना जन्म देतात, त्यासाठी मोठी रक्कमही ते मोजतात. तंत्रज्ञान हे दुधारी शस्त्रासारखे असते. त्याचा वापर हा विधायक उपक्रमांसाठी व्हायला हवा, यासाठी वैद्यकीय क्षेत्राने अधिकाधिक आग्रही राहायला हवे, असेही त्या या वेळी म्हणाल्या.
जागतिक आरोग्य संघटनेने घालून दिलेल्या नियमावलीनुसार- आयव्हीएफ तंत्रज्ञानाचा वापर हा 45 वयोमानाच्या आतील महिलांनी करावा, असे स्पष्टपणे नमूद करण्यात आले आहे. मासिक पाळी जाण्यापूर्वी या विकसित तंत्रज्ञानाचा लाभ घेऊन गर्भधारणा केल्यास त्याचे आरोग्यावर अनिष्ट परिणाम होत नाहीत; मात्र, पन्नाशी पार केलेल्या महिला जेव्हा "आयव्हीएफ'चा वापर करून मुलांना जन्म देतात, तेव्हा त्यांच्यामध्ये आई आणि बाळ या दोन्ही जीवांना अधिकाधिक धोका असतो. वाढत्या वयातील महिलांना उच्च रक्तदाब, मधुमेह यासारख्या व्याधी असतात; त्यामुळे प्रसूतीच्या वेळी त्याचा धोका वाढीस लागून, महिला दगावण्याचा संभव असतो. आयव्हीएफ तंत्रज्ञानाचा वापर करून झालेल्या प्रसूतीमध्ये अनेकदा जुळी किंवा तिळी मुले होण्याची दाट शक्यता असते. या नवजात अर्भकांना अन्य आजारांची लागण पटकन होऊन, त्यांच्याही जीवास धोका असतो. या साऱ्या गोष्टींवर विचार करून, या तंत्रज्ञानाच्या विपरीत वापराबाबत वैद्यकीय क्षेत्राने त्वरित पावले उचलावीत, अशीही मागणी डॉ. शहा यांनी या वेळी केली.