सकाळ वृत्तसेवा
२२ एप्रिल २०१०
नागपूर, भारत
तंबाखू, गुटखा आणि सुपारीसारख्या पदार्थाचे सेवन करणाऱ्यांपैकी सुमारे 33 टक्के लोकांना तोंडाचा आजार होत असून, यात युवा वर्गाचे प्रमाण मोठे असल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे. तोंडाचा आजार जडलेल्या व्यक्तींना पुढे कन्सर होतो असे डॉ. मदन कापरे पत्रकारांशी बोलताना म्हणाले.
तोंडाचा आजार झाल्यानंतर तोंड उघडता येत नाही. अशावेळी तोंडातील त्वचेवर शस्त्रक्रियेशिवाय पर्याय नसतो. ही शस्त्रक्रिया अतिशय जोखमीची आहे. या शस्त्रक्रियेची माहिती वैद्यक क्षेत्रातील व्यक्तींना व्हावी, तसेच जनतेला तंबाखूजन्य पदार्थाच्या सेवनाचे दुष्परिणाम कळावेत यासाठी दोनदिवसीय कार्यशाळेचे आयोजन हॉटेल सेंटर पॉइंट येथे करण्यात आले आहे. तंबाखू सेवनाचे सर्वाधिक प्रमाण गुजरातमध्ये असले तरी महाराष्ट्र राज्यदेखील मागे नाही. दुसऱ्या क्रमांकावर महाराष्ट्र आहे. असे डॉ. कापरे यांनी सांगितले. केरळ राज्यात तंबाखू खाण्याचे प्रमाण मोठे असल्याची माहिती त्यांनी दिली. तंबाखूजन्य पदार्थामुळे तोंडाचे आजार हमखास होतात. अतिसेवनामुळे एक सेंटीमीटर तोंड उघडणे कठीण होते, अशावेळी शस्त्रक्रियेशिवाय पर्याय नसतो. ही शस्त्रक्रिया करणाऱ्या डॉक्टरांची राज्यात वानवा आहे. या कार्यशाळेच्या माध्यमातून या आजारावरील शल्यक्रिया करणारे डॉक्टर तयार व्हावे हा उद्देश या कार्यशाळेचा आहे.
शनिवारी (ता.24) पहिल्या सत्रात मुंबईच्या जसलोक हॉस्पिटलचे डॉ. जे. एन. खन्ना यांच्या हस्ते उद्घाटन होईल. यानंतर तांत्रिक सत्राला सुरवात होईल. डॉ. जे. एन. खन्ना, भोपालच्या पीपल्स वैद्यकीय महाविद्यालयाचे डॉ. आशुतोष मंगलगिरी, डॉ. मुंबईचे दंतशल्यचिकित्सक डॉ. दफ्तरी, डॉ. मदन कापरे, डॉ. बोरले, डॉ. नितीन भोला तोंडावरील आजाराच्या शस्त्रक्रियेचे प्रात्यक्षिक करून दाखविणार आहेत. नीती गौरव अपार्टमेंटमधील रुग्णालयात होणाऱ्या शस्त्रक्रियेचे प्रक्षेपण थेट हॉटेल सेंटरपॉइंटमध्ये सुरू असलेल्या कार्यशाळेत दाखविण्यात येईल. तंबाखूजन्य पदार्थाच्या सेवनामुळे होणाऱ्या दुष्परिणामांची माहिती देण्यासाठी रविवारी (ता.25) दुपारी 4 वाजता खुल्या सत्र घेण्यात येणार आहे. पत्रपरिषदेला डॉ. राजेंद्र देशमुख, डॉ. सुरेंद्र गवारले, डॉ. सुधांशू कोठे, डॉ. व्ही. डी. देशपांडे उपस्थित होते.
प्रशिक्षक तयार करण्याचा उपक्रम
तंबाखूजन्य पदार्थाच्या सेवनाचे दुष्परिणाम सांगण्याची जबाबदारी केवळ डॉक्टरांची नाही. तर, युवावर्गाचाही या उपक्रमात त्यांचाही समावेश असावा या हेतूने प्रशिक्षक तयार करण्यासाठी या कार्यशाळेतून साध्य होईल, असा विश्वास डॉ. मदन कापरे यांनी व्यक्त केला.
33 टक्के लोकांना तोंडाचे आजार
- Details
- Hits: 5081
0