सकाळ वृत्तसेवा
०७ मे, २०१०
राजापुर, भारत
शासनातर्फे दारिद्रयरेषेखालील कुटुंबांसाठी जाहीर केलेली स्वास्थ विमा योजना तालुक्यातील देवाचेगोठणे गावामध्ये राबविल्याबाबत देवाचेगोठणे ग्रामपंचायतीने दिलेल्या असमाधानकरक माहितीच्या विरोधात सामाजिक कार्यकर्ते अशोक मयेकर यांनी जिल्हा सनियंत्रण समितीकडे तक्रार केली आहे.
दारिद्य्ररेषेखालील लोकांसाठी शासनाने स्वास्थ विमा योजना जाहीर केली. या योजनेचा लाभ घेण्यासाठी संबंधित लाभधारकांना स्मार्ट कार्डचे शासनातर्फे वाटप करण्यात येणार आहे. ही योजना देवाचेगोठणे गावामध्येही राबविण्यात आली आहे. गावातील देऊळवाडी आणि राऊतवाडी या वाड्यांमध्ये राबविताना बुरंबेवाडी, केरावळेवाडी आणि सोगमवाडी या वाड्यांमध्ये राबविण्यात आलेली नाही. त्यामुळे या वाड्यांमधील अनेक दारिद्रयरेषेखालील लाभार्थी या योजनेचा लाभ घेण्यापासून वंचित राहिलेले आहेत. यामध्ये श्री. मयेकर असून ही योजना त्यांना लागू होते, तर त्या योजनेतून मिळणाऱ्या स्मार्ट कार्डच्या साह्याने त्यांच्या मुलीवर उपचार करणे त्यांना शक्य झाले असते; मात्र या कामामध्ये संबंधितांनी दिरंगाई केल्याने या योजनेचा त्यांना लाभ घेता आलेला नाही. याबाबतची माहिती श्री. मयेकर यांनी ग्रामपंचायतीकडे माहितीच्या अधिकाराखाली मागितली होती. ग्रामपंचायतीकडून याबाबत समाधानकारक माहिती मिळालेली नाही. त्याविरोधात श्री. मयेकर यांनी जिल्हा सनियंत्रण अधिकाऱ्यांकडे तक्रार करून या योजनेची चौकशी करण्याची मागणी केली आहे.