सकाळ वृत्तसेवा
२५ मे २०१०
पुणे, भारत
विविध पातळ्यांवर प्रयत्न करूनही स्तनपानाबाबत मातांमध्ये जागृती झालेली नाही, असे कोल्हापूर येथील ज्येष्ठ प्रसूती व स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. सतीश पत्की यांनी सोमवारी येथे सांगितले. 2005 मध्ये राज्यात 53 टक्के माता आपल्या बाळांना पहिल्या सहा महिन्यांत, तर 52 टक्के माता प्रसूतीनंतर पहिल्या दिवशी स्तनपान देतात, असेही त्यांनी स्पष्ट केले.
डॉ. पत्की म्हणाले, केंद्र सरकार, राज्य सरकार आणि युनिसेफ' अनेक माध्यमांतून स्तनपानाचे महत्त्व सर्वसामान्य मातांपर्यंत पोचविण्याचा प्रयत्न करीत आहे. मात्र, अद्यापही स्तनपानाबाबत जागृती झाल्याचे चित्र शासकीय आकडेवारीवरून दिसून येत नाही. नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या शासकीय आकडेवारीनुसार 1998 मध्ये राज्यातील 23 टक्के माता प्रसूतीनंतर पहिल्या दिवशी बाळाला स्तनपान देत होत्या. हेच प्रमाण 2005 मध्ये 52 टक्के आहे. 2005 मध्ये पहिल्या सहा महिन्यांमध्ये बाळाला फक्त स्तनपान देणाऱ्या 7 टक्के माता होत्या. 2005 पर्यंत हे प्रमाण 53 टक्क्यांपर्यंत वाढले आहे. हे प्रमाण फार कमी आहे. यात वाढ झाली पाहिजे.
मातेच्या दुधात मूळ पेशी असतात, हे संशोधनातून सिद्ध झाले आहे. त्यामुळे बालमृत्यू टाळता येतात. स्तनपानातून मिळालेल्या मूळ पेशीमळे जन्मल्यापासून एक महिन्याच्या आतील 22 टक्के मृत्यू टाळता येतात. एक वर्षाच्या आतील बालकांचे मृत्यू चार पटीने कमी होतील, तर पाच वर्षांच्या आतील तेरा टक्के मृत्यूवर मात करता येईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
ही जनजागृती अधिक प्रभावीपणे होण्यासाठी सरकारी यंत्रणांनी या संशोधनाचा उपयोग करावा, असे आवाहन डॉ. पत्की यांनी केले.
स्तनपानाबाबत मातांमध्ये अद्याप जागृती झालेली नाही
- Details
- Hits: 3419
0