सकाळ वृत्तसेवा
२४ मे २०१०
येरवड, भारत
स्किझोफ्रेनिया हा एक मनोविकार आहे. ज्यामध्ये वैचारिक व भावनिक गुंतागुंत होऊन रुग्ण पूर्णपणे गुरफटून जातो आणि एका काल्पनिक अथवा आभासी विश्वात जगायला लागतो. तेच आपले खरे विश्व वाटायला लागते, असे येरवडा प्रादेशिक मनोरुग्णालयाचे अधीक्षक डॉ. मनोहर यादव यांनी सांगितले.
सोमवारी (ता. 24 मे) सर्वत्र जागतिक स्किझोफ्रेनिया दिन पाळला जाणार आहे. त्यानिमित्त डॉ. यादव म्हणाले, माणूस म्हटले की भावना, विचार, वर्तणूक आलेच; परंतु जेव्हा याच गोष्टी त्रासदायक होऊ लागतात, तेव्हा माणसाचे संपूर्ण व्यक्तिमत्त्वच उद्ध्वस्त होते आणि उरतो तो फक्त भावनाशून्य हाडा मांसाचा गोळा. ज्याचे ओझे आयुष्यभर वहावे लागते. हा आजार तरुण वयातल्या कोणत्याही लिंग, जात, धर्म, वर्ग असलेल्या व्यक्तीला होऊ शकतो. हा आजार आनुवंशिकता व मेंदूतील रासायनिक बदल यामुळे होतो. एकलकोंडेपणा, संशयीपणा, अनावश्यक चिडचिड, भास, बडबड, वैयक्तिक दुर्लक्ष व आत्महत्येचे विचार किंवा अचानक येणारा उन्माद ही काही प्रमुख लक्षणे या आजारात पाहायला मिळतात.
स्किझोफ्रेनिया' हा दीर्घकालीन आजार आहे. यातून रुग्णाला पूर्णपर्ण बरे करणे अवघड असले, तरी योग्य वेळी घेतलेला सल्ला व नियमित उपचार यामुळे या रुग्णांना कार्यक्षम ठेवण्याचा चांगला प्रयत्न करून शकतो. आज उपलब्ध असलेल्या विविध उपचारपद्धतींमुळे हे शक्य झाले आहे. प्रादेशिक मनोरुग्णालय हे याच दिशेने विविध उपाययोजना व उपक्रम राबविण्याचा प्रयत्न करत आहे. याठिकाणी बाह्यरुग्ण सेवा, आंतररुग्ण सेवा ज्यामध्ये औषधोपचार, विद्युतकंप, संगीतोपचार, व्यवसायोपचार आदींचा समावेश आहे. मनोरुग्णालयात सध्या भेडसावणारा सगळ्यात मोठा प्रश्न म्हणजे येथे कायमस्वरूपी वास्तव्यास असलेले रुग्ण आणि त्यांचे पुनर्वसन आहे, असेही यादव यांनी सांगितले.
मनोरुग्णांचे पुनर्वसन करण्यासाठी...
मनोरुग्णांचे पुनर्वसन अधिक चांगल्या प्रकारे होण्यासाठी समाजातील प्रतिष्ठित व्यक्ती, स्वयंसेवी संस्था आणि सामान्य नागरिक यांनी पुढे येऊन आपली मते, सूचना रुग्णालयाला देण्याचे आवाहन डॉ. मनोहर यादव यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी अधीक्षक, प्रादेशिक मनोरुग्णालय, येरवडा, पुणे-411 006. दूरध्वनी(020)2669 2543. यांच्याशी संपर्क साधावा.
स्किझोफ्रेनिया एक मनोविकार
- Details
- Hits: 5222
0