सकाळ वृत्तसेवा
१३ ऑगस्ट २०१०
मुंबई, भारत
महापालिकेने आपला कोट्यवधी रुपयांचा भूखंड दिलेल्या सेव्हन हिल्स रुग्णालयाचा खरा चेहरा अखेर उघड झाला आहे. धनदांडग्यांना डोळ्यासमोर ठेवून बांधण्यात आलेल्या या रुग्णालयात गोरगरीब रुग्णांच्या उपचारांत भेदभाव होत असल्याची तक्रार रुग्णांनीच केली आहे. त्यामुळे रुग्णालय व पालिकेत पुन्हा नव्याने वाद पेटण्याची शक्यता आहे.
पालिका आणि सार्वजनिक खासगी भागीदारीतून अंधेरी-मरोळ येथे हे पंचतारांकित रुग्णालय बांधण्यात आले आहे. पहिल्या टप्प्यातील 300 खाटांचे रुग्णालय नुुकतेच सुरू झाले आहे. पालिकेच्या गरीब रुग्णांसाठी 20 टक्के खाटा राखीव ठेवण्याच्या अटीवर पालिकेने रुग्णालयासाठी आपला भूखंड दिला आहे. उद्घाटनापूर्वीच रुग्णालय व्यवस्थापनाने गरिबांसाठी राखीव खाटा ठेवण्यास नकार दिल्याने पालिका प्रशासन व व्यवस्थापनात वाद पेटला होता.
पालिकेच्या रुग्णांना भेदभावाची वागणूक मिळत असल्याची तक्रार येथे दाखल झालेल्या रुग्णांनीच आता केली आहे. त्यामुळे महापौर श्रद्धा जाधव यांनी आज अचानक रुग्णालयाला भेट दिली. त्या वेळी रुग्णांनी सेवा-सुविधांचा पाढाच महापौरांपुढे वाचला. महापौरांसमवेत आमदार डॉ. दीपक सावंत व विनायक राऊत हेही उपस्थित होते.
रुग्णांच्या तक्रारी ऐकून घेतल्यानंतर महापौरांनी व्यवस्थापनाची भेट घेऊन तीव्र नाराजी व्यक्त केल्याचे सांगण्यात आले. रुग्णांना पालिकेच्याच दराने वैद्यकीय सेवा-सुविधा देण्याच्या सूचना त्यांनी व्यवस्थापनाला दिल्या. रुग्णांना चांगल्या दर्जाच्या सेवा मिळणे हा त्यांचा हक्क आहे, असे स्पष्ट करून महापौरांनी लवकरच रुग्णालयाबाबत पालिकेची भूमिका जाहीर करणार असल्याचे सांगितले. भूमिका जाहीर करण्याबाबत महापौरांनी दिलेला इशारा म्हणजे व्यवस्थापन व पालिकेत पुन्हा नव्याने वाद पेटण्याची नांदीच असल्याची माहिती पालिकेतील सूत्रांनी दिली.