सकाळ वृत्तसेवा
१६ ऑगस्ट २०१०
शर्मिला कलगुटकर
मुंबई, भारत
प्रतिजैविकांना न जुमानणाऱ्या "सुपरबग'ची उत्पत्ती भारतातील नसल्याचा दावा वैद्यकीय क्षेत्रातून केला जात असला तरीही हा "अलर्ट' वेळीच लक्षात घेऊन "हॉस्पिटल इन्फेक्शन सोसायटी ऑफ इंडिया'ने काही महत्त्वपूर्ण पावले उचलली आहेत. प्रतिजैविकांना न बधणाऱ्या विषाणूंची पैदास आणि त्यांचा संसर्ग होऊ नये यासाठी आता देशातील रुग्णालयामध्ये "निर्जंतुकीकरण आणि संसर्गप्रतिबंध' या विषयाबाबत अधिक सुस्पष्ट नियमावली नमूद करण्यात येणार आहे. सोसायटीच्या मुंबई झोनच्या सेक्रेटरी आणि टाटा मेमोरिअल रुग्णालयाच्या मायक्रोबायॉलॉजी विभागाच्या प्रमुख डॉ. रोहिणी केळकर यांच्या मार्गदर्शनाने ही नियमावली बनवण्यात येणार आहे.
रुग्णालयामधून होणाऱ्या विषाणूंचा संसर्ग टाळण्यासाठी शस्त्रक्रिया विभागामध्ये कोणत्या मूलभूत गोष्टीची काळजी घ्यायला हवी, याबाबत डॉ. केळकर यांनी महत्त्वपूर्ण काम केलेले आहे. "सुपरबग'च्या निमित्ताने सुरू झालेली प्रतिजैविकांची क्षमता, त्यांचा रुग्णांवर होणारा दुष्परिणाम या साऱ्यांचे मूळ हे रुग्णालयातील स्वच्छता आणि विविध प्रकारच्या आजारामधून संसर्गित होणाऱ्या विषाणूंच्या प्रसारामध्ये असते. या विषाणूंची लागण झाल्यानंतर त्याचा संसर्ग टाळण्यासाठी रुग्णांवर प्रतिजैविकांचा भडिमार करतात. कोणत्याही शस्त्रक्रियेपूर्वी दहा दिवस त्यानंतर दहा दिवस संबधित रुग्णांस प्रतिजैविके दिली जातात. अनेकदा त्या रुग्णाला त्याची कोणतीही कल्पना नसते व त्याची निकडही नसेत. हजारो रुपयांच्या या प्रतिजैविकांचा वापर रुग्णावर करण्यापूर्वी रुग्णालयांतील स्वच्छतेचे मूलभूत निकष पाळले जावेत यासाठी "हॉस्पिटल इन्फेक्शन सोसायटी' कित्येक वर्ष झगडत असल्याचे डॉ. केळकर सांगतात. शस्त्रक्रियेच्या वेळी होणाऱ्या विषाणू संसर्गाचा धोका सर्वाधिक जास्त असतो, या वेळी वापरण्यात येणारी उपकरणे, त्यांची स्वच्छता ही अधिक महत्त्वाची असते; मात्र ज्या रुग्णालयांमध्ये लाखो रुपयांच्या मशीन्स विकत घेतल्या जातात, तेथे काही हजारांचा साबण घेण्यासाठी पैसे नसल्याचे कारण पुढे केले जाते, म्हणूनच काही वर्षांपूर्वी सोसायटीच्या पुढाकाराने ऑपरेशन थिएटरमध्ये कोणत्या प्रकारची नियमावली असावी हे स्पष्ट करण्यात आले होते. यापुढील टप्पा म्हणजे निर्जंतुकीकरण आणि संसर्गप्रतिबंधातून अधिक व्यापक मोहीम उभारण्यात येणार आहेत. यामध्ये रुग्णालयांनी कोणती उपकरणे विकत घ्यावीत, ही उपकरणे बनवणाऱ्या कंपन्यांनी कोणते निकष पाळावेत, या उपकरणांची तपासणी कशी करण्यात यावी, याबाबत स्पष्ट निर ्देश दिलेले आहेत.
"सुपरबग'च्या निमित्ताने प्रतिजैविकांच्या अफाट वापरावर अंकुश ठेवणारे सुस्पष्ट वैद्यकीय धोरण असावे, अशीही मागणी जोर धरू लागली आहे. याच विषयावर जगातील तेरा देशांतील तज्ज्ञांचे चर्चासत्रही सोसायटीकडून आयोजित करण्यात येणार आहे. अत्याधुनिक तंत्रज्ञानामध्ये लेप्रोस्कोपीने शस्त्रक्रिया करण्यासाठी जी पद्धती वापरली जाते, त्यामध्ये विषाणूसंसर्गाचा सर्वात मोठा धोका व्यक्त करण्यात येतो, त्यासाठी कोणती काळजी घ्यायला हवी, याबाबत स्पष्ट संकेत अद्यापही दिले गेलेले नाही. वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञांनी पाळायच्या निकषांप्रमाणेच रुग्णांच्याही परिस्थितीचा गांभीर्याने विचार व्हायला हवा. तैवानसारख्या देशामध्ये प्रतिजैविकांच्या वापरांबाबत निर्बंध खूप कडक आहेत. प्रतिजैविकांची सर्रास उपलब्धता आणि गरीब रुग्णांच्या खिशाला त्याचा न झेपणारा खर्च या दोन्ही गोष्टी घातक असल्याचे मत "केईएम' रुग्णालयाच्या फार्माकोलॉजी विभागाच्या विभागप्रमुख डॉ. उर्मिला थत्ते व्यक्त करतात. पैसे नसल्यामुळे घेतला जाणारा अर्धवट औषधांचा डोसदेखील घातक ठरतो; तसेच मेडिकल स्टोअर्समधून सर्रास दिली जाणारी प्रतिजैविकेही तितकीच मारक असतात, अजून काही काळाने प्रतिजैविकांची क्षमताच संपुष्टात आली, की पुन्हा एकदा पूर्वी वापरले जाणारे "डोस' कामी येतील.