सकाळ वृत्तसेवा
०८ मे, २०१०
पुणे, भारत
अनुवांशिकतेखालोखाल शस्त्रक्रिया करून केलेल्या प्रसूतीमुळेही (सिझेरियन डिलिव्हरी) बालदमा होत असल्याचे भारतातील पहिले संशोधन मारिया चिरागी या इराणी महिलेने पुण्यात केले. चेस्ट रिसर्च फाउंडेशन'मध्ये (सीएफआर) केलेल्या या प्रकल्पाचे सादरीकरण विविध आंतरराष्ट्रीय संशोधन परिषदांमध्ये करण्यात आले आहे.
पुण्यातील बालदम्याचे प्रमाण झपाट्याने वाढत आहे. "सीआरएफ'ने 2003 मध्ये केलेल्या पाहणीनुसार पुण्यातील बालदम्याचे प्रमाण 2.9 टक्के होते. एक वर्षापूर्वी म्हणजे 2009 मध्ये मारिया यांनी केलेल्या संशोधनाच्या पहिल्या टप्प्यात बालदम्याच्या रुग्णांची संख्या 5.4 टक्क्यांपर्यंत वाढल्याचे स्पष्ट झाले. यासाठी मारिया यांनी महापालिकेच्या आणि खासगी शाळेतील सहा हजार 100 मुलांची माहिती गोळा केली. या प्रकल्पाच्या दुसऱ्या टप्प्यात या मुलांना बालदमा का झाला, याचे संशोधन करण्यात आले. त्यातून हा निष्कर्ष काढण्यात आल्याची माहिती मारिया यांनी सकाळ'ला दिली. बालदमा या विषयावर मारिया "पीएच. डी.' करीत आहेत.
त्या म्हणाल्या, या संशोधनासाठी चार हजार विद्यार्थ्यांच्या पालकांकडून प्रश्नावली भरून घेतली. त्यात प्रसूती कशी झाली, घरात कोणाला दमा होता का अशा प्रश्नांचा त्यात समावेश होता. स्वयंपाकघर कसे आहे, भिंतींना ओल आली आहे का अशी निरीक्षणेही यात नोंदविण्यात आली आहेत. तपासणी केलेल्यांपैकी 32 टक्के विद्यार्थ्यांना आनुवंशिक दमा आहे. आत्तापर्यंत दम्याचे हे एकमेव कारण सांगितले जात होते. शस्त्रक्रिया करून झालेल्या प्रसूतीमुळेही बालदमा होतो, हे यातून पुढे आले. बालदमा असलेल्या अठरा टक्के विद्यार्थ्यांचा जन्म "सीझर' करून झाला आहे. दहा टक्के मुलांच्या घरात स्वयंपाकघर स्वतंत्र नाही, तर नऊ टक्के बालकांचा जन्म नऊ महिन्यांच्या आतच झाला आहे. त्यामुळे बालदम्याची ही नवीन कारणे समोर आली आहेत.
या संशोधनासाठी 6, 7 आणि 13, 14 वयोगटातील विद्यार्थ्यांची तपासणी करण्यात आली. यासाठी डॉ. संदीप साळवी यांनी मार्गदर्शन केले.
नैसर्गिक प्रसूती होताना अर्भक काही जिवाणूंच्या संपर्कात येते. अर्भकामधील प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी हे जिवाणू उपयुक्त ठरतात. "सीझर' करून जन्मलेल्या मुलांमध्ये ही प्रतिकारशक्ती निर्माण होत नाही. त्यामुळे त्यांना बालदमा होतो, असे गृहितक असल्याचे प्रकल्पाच्या समन्वयक डॉ. मोनिका बारणे यांनी सांगितले.
या निष्कर्षावर मोठ्या संख्येने अभ्यास करण्याची आवश्यकता मारिया यांनी व्यक्त केली. त्यासाठी "सीआरएफ' पुढाकार घेऊन बालरोगतज्ज्ञांच्या मदतीने हा प्रकल्पावर पुढील अभ्यास करीत असल्याची माहिती डॉ. बारणे यांनी दिली.
नियंत्रण हाच प्रभावी उपाय'
नियमित औषधांवर दम्याचे रुग्ण कुठलेही पथ्य न पाळता सर्वसामान्य जीवन जगू शकतात. दमा पूर्णपणे बरा होऊ शकला नाही, तरीही त्यावर नियंत्रण ठेवणे शक्य आहे. हा आजार नीट आटोक्यात ठेवल्यास औषधांचा डोसही कमी ठेवता येतो, असा सल्ला डॉ. बारणे यांनी दिला.
यामुळेही होतो दमा
- पूर्ण दिवस भरले नसताना प्रसूती होणे (प्रिमॅच्युअर डिलिव्हरी).
- शस्त्रक्रिया करून प्रसूती (सिझेरियन डिलिव्हरी).
- स्वयंपाकघर स्वतंत्र नसणे, घराच्या भिंतींना ओल येणे.
- घरात धूम्रपान करणे.