सकाळ वृत्तसेवा
३० ऑगस्ट २०१०
गोंदिया, भारत
चंडीपुरानंतर स्वाइन फ्लू आणि आता डोळे येण्याच्या संसर्गजन्य आजाराने गोंदियाकरांना ग्रासलेले असल्याने जिल्हावासी नागरिकांची चांगलीच दमछाक सुरू झाली आहे. त्यामुळे स्वतःची आणि कुटुंबीयांची काळजी घेण्याकरिता सर्वजण प्रतिबंधक उपाय शोधू लागले आहेत.
पावसाळ्यात दूषित पाण्यामुळे होणाऱ्या अनेक आजारांसोबतच साथीच्या आजारातदेखील अचानक वाढ झाली आहे. त्यामुळे सध्या गोंदियाकरांनी डोळ्यांच्या सुरक्षेकरिता मोठ्या प्रमाणात काळ्या रंगाचे गॉगल्स लावणे सुरू केले आहे. ही साथ वेगाने पसरत असल्याने गॉगल लावलेली व्यक्ती दिसली की नागरिक त्यापासून चार हात लांबच राहण्याची खबरदारी घेताना दिसत आहेत. डोळ्यांचा आजार जडलेले अनेकजण गॉगलचा वापर करीत असले, तरी लालबुंद डोळ्यांनी फिरत असल्याने या आजाराचा फैलाव मोठ्या प्रमाणात होण्याची शक्यता बळावली आहे. तथापि, जिल्हा सामान्य रुग्णालयात डोळे आलेल्या रुग्णांची संख्या वाढली नसल्याची माहिती निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. खंडाते यांनी दिली. या साथीची लागण झाल्यानंतर वेळीच उपचार न घेतल्यास डोळे जाण्याची शक्यतादेखील असते, अशीही माहिती त्यांनी दिली. त्यामुळे वेळेवर उपचार केल्यास हा आजार लगेच बरा होतो, अशी पुष्टीही त्यांनी दिली. डोळ्यांच्या खासगी रुग्णालयात मात्र मोठ्या प्रमाणात रुग्णांची गर्दी वाढली असल्याचे निदर्शनास येत आहे.
काय करायला हवे?
बाहेरून घरी आल्यावर डोळे स्वच्छ पाण्याने धुवावेत. रुग्णाने डोळ्यांना वारंवार हाताचा स्पर्श करू नये. रुग्णाच्या वापरातील साहित्य इतर कोणी वापरू नये. डोळे लाल होताच डॉक्टरांचा ताबडतोब सल्ला घ्यावा. वेळीच उपचार करणे यावेळी गरजेचे आहे. वारंवार साबणाने हात स्वच्छ धुवावे.