Print
Hits: 3054

सकाळ वृत्तसेवा
२८ मे २०१०
शर्मिला कलगुटकर
मुंबई, भारत

सार्वजनिक रुग्णालये ही गोरगरीबांप्रमाणेच समाजातील उच्चभ्रू व परदेशी रुग्णांनाही तितक्‍याच उत्तम दर्जाची सेवा पुरवू शकतात, हा विश्‍वास सार्थ करण्यासाठी आता महाराष्ट्र शासनाने राज्यातील वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये अत्युत्तम वैद्यकीय सेवासुविधा असणारी नर्सिग होम्स सुरू करायचे ठरवले आहे. सार्वजनिक रुग्णालयांकडे पाहण्याचा पारंपरिक दृष्टिकोन बदलवणे व त्याच वेळी आरोग्य पर्यटनास चालना देणे असा दुहेरी मानस या उपक्रमामागे आहे.

सार्वजनिक रुग्णालयांमध्ये येणारे रुग्ण गरीब किंवा मध्यमवर्गातले असतात. त्यांना ही सेवा संपूर्णपणे मोफत दिली जाते. अनेकदा मोठ्या व्याधीसाठी उच्चभ्रू वर्गातील रुग्ण येथे येतात. पण, रुग्णालयात दाखल होण्याची वेळ आली तर ते अन्य महागड्या रुग्णालयांना पसंती देतात, असा अनुभव वैद्यकीय शिक्षण व संशोधन विभागाचे सहसंचालक डॉ. प्रवीण शिनगारे सांगतात. त्यामागील कारणांचा शोध घेताना या रुग्णालयांत इतरत्र मिळते तशी "एलिट' व्यवस्था नसते. या वर्गातील रुग्णांसाठी एसी, टीव्ही, संगणक आदी सुविधांनी सुसज्ज अशा काही खोल्या आरक्षित ठेवल्यास, त्यासाठी शुल्क आकारणी करून येथील उत्तम वैद्यकीय सेवांचा लाभ उच्चभ्रू वर्गासही सहज देता येणे शक्‍य असल्याचेही त्यांनी सांगितले. या प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यामध्ये सेंट जॉर्ज, जे. जे., कामा रुग्णालय येथे व्हीआयपींसाठी विशेष विभाग सुरू करण्यात येणार आहे. मात्र, त्यांना देण्यात येणाऱ्या सुविधांसाठी दर आकारणी करण्यात येईल. त्यातून मिळणाऱ्या उत्पन्नातील काही टक्के हिस्सा हा या रुग्णांच्या देखभालीसाठी नियुक्ती करण्यात येणाऱ्या स्टाफला देण्यात येणार आहे. पुढे जसजसे रुग्णांचे प्रमाण वाढत जाईल, तसतसा येथील स्टाफही वाढवण्यात येईल.

परदेशापेक्षा आपल्या देशातील वैद्यकीय सेवांचा दर हा कमी आहे. प्रत्येक वर्षी येथे आरोग्यसेवांचा लाभ घेण्यासाठी येणाऱ्या पर्यटकांची संख्या वाढते आहे. अलिबाग, महाबळेश्‍वर, पाचगणी, गणपतीपुळे या ठिकाणी असणाऱ्या आयुर्वेद केंद्रांतील "स्पा थेरपी'साठी जाणाऱ्या व तिथेच महिनाभर मुक्कामी राहणाऱ्या पर्यटकांची संख्या प्रत्येक वर्षी वाढते आहे. त्यामुळे या पर्यटकांसाठीही काही विशेष आरोग्यसुविधा शासनाच्या व पर्यटन विभागाच्या मदतीने देण्यात येणार आहेत. याच उपक्रमाचा भाग म्हणून गोंदिया, नागपूर, गडचिरोली, रोहा या ठिकाणी नव्या वैद्यकीय महाविद्यालयांची सुरुवात केली जाणार आहेच, पण त्याचसोबत येथे व्हीआयपींसाठी पन्नास खाटांची अत्याधुनिक वैद्यकीय सेवा असणारी नर्सिंग होम्सही बांधली जाणार आहेत.

Disclaimer: The news story on this page is the copyright of the cited publication. This has been reproduced here for visitors to review, comment on and discuss. This is in keeping with the principle of ‘Fair dealing’ or ‘Fair use’. Visitors may click on the publication name, in the news story, to visit the original article as it appears on the publication’s website.