सकाळ वृत्तसेवा
२२ एप्रिल २०१०
योगीराज प्रभुणे
पुणे, भारत

महागाईने होरपळून निघणाऱ्या नागरिकांना आता औषधेही महाग झाली आहेत. मधुमेह आणि उच्च रक्तदाबासह दैनंदिन जीवनात सर्रास वापरल्या जाणाऱ्या औषधांच्या किमतींत गेल्या काही महिन्यांपासून सातत्याने वाढ होत आहे. औषध निर्माण कंपन्यांच्या संघटनेने मात्र याबाबत कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.
दूध, भाजी, पेट्रोल यांसारख्या जीवनावश्यक वस्तूंच्या दरामध्ये सातत्याने वाढ होत आहे. या महागाईमुळे सामान्य माणूस पिचून गेला आहे. त्यातच बहुतांश औषधांच्या किमतीही काही महिन्यांपासून वाढत असल्याचे स्पष्ट झाले आहे.
जगात मधुमेहाचे सर्वाधिक रुग्ण भारतात आहेत. त्यामुळे भारताला मधुमेहाची "राजधानी' म्हटले जाते. या आजाराच्या रुग्णाचे प्रमाण झपाट्याने वाढत आहे. तरुणांमध्येही मधुमेह असल्याचे निदान होत आहे. त्यामुळे भारत ही या आजारावरील औषधांची मोठी बाजारपेठ झाली आहे. मधुमेहावर नियंत्रण ठेवण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या औषधांच्या किमतींत मोठी वाढ झाली आहे. मधुमेहासाठी वेगवेगळ्या कंपन्यांच्या 10 गोळ्यांची पट्टी काही महिन्यांपूर्वी 28 रुपयांपासून ते 50 रुपयांपर्यंत मिळत होती. त्याची सध्या किंमत 30 ते 60 रुपयांपर्यंत झाली आहे.
उच्च रक्तदाब नियंत्रित ठेवणाऱ्या औषधांच्या किमतीही वाढल्या आहेत. यापूर्वी उच्च रक्तदाबाच्या वेगवेगळ्या कंपन्यांच्या दहा गोळ्या 28 ते 72 रुपयांपर्यंत मिळत होत्या. त्यांची किंमत आता 32 रुपये 50 पैसे ते 78 रुपये 50 पैसे झाली आहे.
पॅरासिटेमॉलच्या पंधरा गोळ्यांची किंमत 15 रुपयांवरून 16 रुपये 80 पैसे झाली आहे. पोटदुखीवरील गोळी 22 वरून 24 रुपये, तर "पेन किलर' प्रकारातील गोळीची किंमत 29.50 वरून 32 रुपयांपर्यंत वाढली आहे. गर्भनिरोधक गोळ्यांच्या एका गोळीची किंमत 60 वरून 80 रुपये, तर दुसऱ्या एका कंपनीच्या गोळ्यांची किंमत 90 वरून शंभर रुपये करण्यात आली आहे.
औषधांसाठी लागणारा बहुतांश कच्चा माल चीनमधून आयात केला जातो. 2008 मध्ये तेथे ऑलिंपिक स्पर्धा होत्या. तेथील प्रदूषण नियंत्रणात आणण्यासाठी या कच्च्या मालाचे उद्योग बंद करण्यात आले होते. त्यामुळे याच्या किमती वाढल्या होत्या. पेट्रोलियम पदार्थांच्या किमती वाढल्याने सध्या औषधे महाग झाल्याची चर्चा आहे.
"केमिस्ट असोसिएशन ऑफ पुणे डिस्ट्रिक्ट'चे महेंद्र पितळिया म्हणाले, औषधांच्या किमती वाढल्याचा ताण औषध विक्रेत्यांवरही पडला आहे. औषधांमधील गुंतवणुकीचा खर्च वाढला आहे."