Print
Hits: 3502

सकाळ वृत्तसेवा
०७ जुलै २०१०
विष्णू सोनवणे
मुंबई, भारत

थंडी, ताप, उलट्या, जुलाब यामुळे मुंबई बेजार झाली आहे. पालिकेच्या उपनगरीय रुग्णालयात रुग्णांची दररोज झुंबड उडत आहे. रुग्णांना दाखल करून घेण्यासाठी जागा नाही. काही रुग्णालयांतील व्हरांड्यात रुग्णांना कोंबले आहे. औषधांचा तुटवडा, उपचारात टाळाटाळ, यामुळे रुग्णांचे हाल सुरू आहेत. पालिका प्रशासनाचे या रुग्णालयांकडे दुर्लक्ष आहे. साथीच्या रुग्णांची दररोज सुमारे 350 ते 400 प्रमाणात नव्याने भर पडत असून, साथीच्या रोगांनी प्रशासनाचा भोंगळ कारभार उजेडात आणला आहे.

साथीच्या रोगाचा प्रादुर्भाव वाढत असताना पालिकेची उपनगरीय रुग्णालये म्हणजे आंधळं दळतंय.. अशी स्थिती आहे. या रुग्णालयांमध्ये अनागोंदी कारभार सुरू आहे. डॉक्‍टर आणि कर्मचारी यांच्यात कोणताही समन्वय नाही. सकाळी आठ वाजल्यापासून रुग्णालयात भल्या मोठ्या रांगा लागत आहेत. मात्र अनेक ठिकाणी डॉक्‍टर आणि इतर कर्मचारी उशिरा येतात. त्यामुळे शेकडो रुग्ण तासन्‌तास रांगेत ताटकळत असतात. उपनगरातील बहुतांशी रुग्णालये ताप आणि गॅस्ट्रोच्या रुग्णांनी फुल्ल आहेत. आता नव्याने रुग्णांना दाखल करून घेतले जात नाही. रुग्णाची स्थिती गंभीर असेल तर त्याला जवळच्या रुग्णालयात जाण्याचा सल्ला दिला जातो. पालिकेच्या विक्रोळी कन्नमवार नगर येथील महात्मा ज्योतिबा फुले सर्वसाधारण रुग्णालयात एका खाटेवर साथीचे दोन रुग्ण दाखल करून घेण्यात येत आहेत. गंभीर स्थितीतील रुग्णांना दाखल करून घ्यायला जागा नसल्याचे तपासून किरकोळ औषधे देऊन घरी पाठविले जाते किंवा त्यांना राजावाडी रुग्णालयात जाण्याचा सल्ला दिला जात आहे. वांद्रे येथील भाभा रुग्णालय, सांताक्रूझ पूर्व येथील व्ही.एन. देसाई रुग्णालय, गोरेगाव येथील सिद्धार्थ रुग्णालय, मालाड येथील स. का. पाटील रुग्णालय, कांदिवली येथील शताब्दी, बोरिवली येथील भगवती रुग्णालय, कुर्ला येथील भाभा रुग्णालय, गोवंडी येथील शताब्दी रुग्णालय, बर्वेनगर येथील मुक्ताबाई रुग्णालय, तसेच मुलुंड येथील अगरवाल रुग्णालय या रुग्णालयांमध्ये मोठ्या प्रमाणात गरीब रुग्ण उपचारांसाठी येत असतात. या रुग्णालयांमध्येही थोड्याफार फरकाने अशीच परिस्थिती आहे. या रुग्णालयांतील रुग्णांना सायन येथील टिळक रुग्णालयात जाण्याचा सल्ला दिला जातो. त्यांना लिहून दिलेल्या औषधांपैकी अनेक औषधे बाहेरून आणावी लागतात. साथीच्या रुग्णांचे प्रमाण झोपडपट्ट्यांमध्ये अधिक आहे.

पालिकेने आरोग्य खात्याच्या माध्यमातून राबविलेल्या आरोग्य अभियानात गेल्या महिन्यात तापाचे 2 हजार 533, खोकल्याचे 3 हजार आणि अतिसाराचे 520 रुग्ण आढळले. आतापर्यंत पालिकेच्या आणि खासगी रुग्णालयात साथीचे 8 हजार 500 रुग्ण दाखल झाले आहेत. या रुग्णालयांमध्ये सुमारे 450 रुग्ण दाखल होत आहेत. गेल्या महिन्याभरात 10 जणांचा साथीने मृत्यू झाला असल्याची माहिती आरोग्य खात्याने दिली आहे. पालिकेच्या आरोग्य खात्याचे अधिकारी मात्र, पुरेसा औषध पुरवठा असून सर्वकाही आलबेल असल्याचे सांगत आहेत.

दाखल असलेल्या रुग्णांची संख्या



Disclaimer: The news story on this page is the copyright of the cited publication. This has been reproduced here for visitors to review, comment on and discuss. This is in keeping with the principle of ‘Fair dealing’ or ‘Fair use’. Visitors may click on the publication name, in the news story, to visit the original article as it appears on the publication’s website.