सकाळ वृत्तसेवा
२६ एप्रिल २०१०
शहाड, भारत
कल्याण-मुरबाड राष्ट्रीय महामार्ग आणि टिटवाळा, अंबरनाथ व उल्हासनगर शहरांना जवळ असलेल्या तालुक्यातील म्हारळ, वरप आणि कांबा या साठ हजार लोकवस्ती असलेल्या गावांत प्राथमिक आरोग्य केंद्राचा अभाव असून या गैरसोयीमुळे नागरिकांच्या आरोग्याची हेळसांड होत आहे.
म्हारळ, वरप, कांबा, पावशे पाडा, वाघरे पाडा, पठार पाडा आणि नाणेपाडा गावांत झपाट्याने नागरिकरण होत आहे; परंतु या गावांत आरोग्य केंद्र नाही. जिल्ह्यातील पहिला कॉलराचा रुग्ण याच गावात आढळला होता. जिल्हा परिषदेच्या शाळा या गावांत असून या शाळांमधून हजारो विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. त्यांच्यात जंतदोष, रातांधळेपणा, त्वचारोग, डोळ्यांचे आजार, दातांचे आजार आदी आजारांची लक्षणे दिसून येतात. या विद्यार्थ्यांच्या तपासण्या करणे गरजेचे आहे. जागतिक आरोग्य संघटनेने तीनशे लोकसंख्येमागे एक डॉक्टर असावा, असा निकष घालून दिला आहे. ग्रामीण भागातील उपकेंद्र, प्राथमिक आरोग्य केंद्र आणि ग्रामीण रुग्णालयाच्या नवीन बांधकामासोबत दुरुस्ती आणि नूतनीकरणाची कामे हाती घेण्यासाठी केंद्र सरकारने राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानाची सुरुवात केली. यासाठी राज्य सरकारला आरोग्य निधीची तरतूद केली जाते; त्यापेक्षा जास्त निधी या अभियानांतर्गत केंद्राकडून प्रतिवर्षी मिळत असताना तो शेवटच्या घटकापर्यंत पोहचत नसल्याचे दिसून येत आहे. या परिसरात आरोग्य केंद्र नसल्याने नागरिकांना गोवेली ग्रामीण रुग्णालयात किंवा उल्हासनगरमधील मध्यवर्ती शासकीय रुग्णालयात धाव घ्यावी लागत आहे. याविषयी कल्याण पंचायत समितीच्या आरोग्य विभागात चौकशी केली असता सांगण्यात आले की, या गावांसाठी आरोग्य केंद्र मंजूर असून यासाठी अडीच एकर जागा उपलबध होत नसल्याने आरोग्य केंद्राचा प्रश्न मार्गी लागलेला नाही.
साठ हजार लोकवस्तीच्या गावांत आरोग्य केंद्राचा अभाव
- Details
- Hits: 2945
0