Print
Hits: 3579

सकाळ वृत्तसेवा
१९ मे २०१०
पुणे, भारत

दिलीप कुर्ह्याडे
राज्यात हिवताप (मलेरिया) नियंत्रणाचा कार्यक्रम राबविला जात असूनही मागील सहा वर्षांत हिवतापाने मृत्युमुखी पडणाऱ्यांची संख्या चारपटीने वाढली आहे. हिवताप, हत्तीरोग आणि जलजन्यरोग सहसंचालक कार्यालयाने प्रकाशित केलेल्या अहवालात हा निष्कर्ष काढण्यात आला आहे.

राज्यात 2004 मध्ये 69 हजार हिवतापाचे रुग्ण आढळले होते. त्यापैकी 61 जणांचा मृत्यू झाला; तर मागील वर्षी 93 हजार 900 रुग्णांपैकी 232 जण हिवतापाने मृत्युमुखी पडले आहेत. त्यातील तब्बल 198 जण मुंबईतील आहेत. या अहवालात मागील सहा वर्षांची आकडेवारी प्रसिद्ध करण्यात आली आहे. मुंबईत मागील वर्षात 44 हजार जणांना हिवताप झाला होता. त्यापैकी 198 जणांचा मृत्यू झाला, तर नाशिक, धुळे, नगर, पुणे, सोलापूर, सातारा, सिंधुदुर्ग, औरंगाबाद, नंदूरबार, नांदेड, अकोला, अमरावती, नागपूर, वर्धा हे जिल्हे 2009 मध्ये हिवतापमुक्त असल्याचे अहवालात म्हटले आहे. तसेच मागील पाच वर्षांत हिंगोली, जालना, परभणी, लातूर, उस्मानाबाद, वाशीम, बुलडाणा, यवतमाळ, नवी मुंबईत एकही हिवतापाचा बळी नसल्याने म्हटले आहे.

मागील सहा वर्षांत राज्यात 860 जण, तर केवळ मुंबईत 623 जण हिवतापाने मृत्युमुखी पडले. सहा वर्षांत गोंदियात 48, तर पुणे आणि चंद्रपूरमध्ये प्रत्येकी 33 रुग्ण हिवतापाने मृत्युमुखी पडले आहेत. हिवतापाने 1995-96 मध्ये 242 व्यक्ती मरण पावल्या होत्या. त्यानंतर हिवतापाने दगावलेल्या रुग्णांची संख्या शंभराच्या आतच राहिली. 2004 -2005 मध्ये राज्यात हिवतापाने 59 रुग्ण मरण पावले होते. आता हीच संख्या चारपटीने वाढून 232 झाली आहे.

मजुरांच्या रक्ताचे नमुने तपासणार
मुंबईमध्ये मागील वर्षापासून युद्धपातळीवर हिवताप नियंत्रण कार्यक्रम राबविला जात आहे. मुंबईत मोठ्या प्रमाणात स्थलांतरित बांधकाम मजूर येत असल्याने ही परिस्थिती उद्‌भवली असल्याचे महापालिकेचे म्हणणे आहे. त्यामुळे बांधकाम व्यावसायिकांनाच मजुरांची रक्त तपासणी करण्याचे बंधनकारक करण्यात आले आहे. तसेच नागरिकांसह मजुरांच्या रक्ताचे नमुनेसुद्धा तपासणीसाठी महापालिकेने कंबर कसली आहे. यावर्षी हिवतापामुळे रुग्ण मृत्युमुखी पडल्याच्या नोंदी अद्ययावत नाहीत. या नोंदीवरूनच राज्यातील एकूण हिवतापाच्या रुग्णांची व मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या कळू शकेल.

Disclaimer: The news story on this page is the copyright of the cited publication. This has been reproduced here for visitors to review, comment on and discuss. This is in keeping with the principle of‘Fair dealing’ or‘Fair use’. Visitors may click on the publication name, in the news story, to visit the original article as it appears on the publication’s website.