सकाळ वृत्तसेवा
३० ऑगस्ट २०१०
पुणे, भारत
"ससून रुग्णालयाच्या नवीन इमारतीच्या बांधकामासाठी तातडीने 20 कोटी रुपये मंजूर करण्यात येतील,'' अशी घोषणा राज्याचे अर्थमंत्री सुनील तटकरे यांनी रविवारी येथे केली. ""वैद्यकीय शिक्षण खात्याने प्रशासकीय मंजुरी दिल्यानंतर लगेचच अतिरिक्त 25 कोटी रुपयांच्या खर्चासही मान्यता देऊ,'' असेही त्यांनी सांगितले.
ससून रुग्णालयात उभारण्यात येणाऱ्या अकरा मजली नवीन इमारतीच्या कोनशिलेचे अनावरण जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या हस्ते करण्यात आले. त्या वेळी तटकरे बोलत होते. राज्याचे वैद्यकीय शिक्षणमंत्री डॉ. विजयकुमार गावित, आमदार माधुरी मिसाळ, महापौर मोहनसिंग राजपाल, माजी आमदार कमल ढोले-पाटील, खात्याचे सचिव मिलिंद म्हैसकर, संचालक डॉ. वासुदेव तायडे आणि बी. जे. महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. अरुण जामकर व्यासपीठावर उपस्थित होते.
डॉ. जामकर यांच्या प्रास्ताविकानंतर पवार यांनी लगेचच बोलण्यासाठी ध्वनिक्षेपकाचा ताबा घेतला. ते म्हणाले, ""डॉ. गावित यांनी नंदुरबार आणि तटकरे यांनी रायगडला वैद्यकीय महाविद्यालय मंजूर करून घेतली आहेत. त्यामुळे वैद्यकीय महाविद्यालय चालविणे हे किती अवघड असते, हे त्यांना कळेल; पण रायगड आणि नंदुरबार येथील यांना निधी मंजूर करण्यापूर्वी इतर महाविद्यालयांच्या निधींना मंजुरी द्यावी. त्याची सुरवात ससून रुग्णालयासाठी अतिरिक्त 25 कोटी रुपये आणि रुग्णालयाच्या वैभवात भर घालण्यासाठी 20 कोटी रुपयांची डिसेंबरपूर्वी मंजुरी द्यावी.''
पवारांच्या भाषणानंतर तटकरे यांनी ससून रुग्णालयाच्या नवीन इमारतीच्या बांधकामासाठी 20 कोटी मंजूर करत असल्याची घोषणा केली. ते म्हणाले, ""गणेशोत्सवापूर्वी हा निधी मिळेल. या रुग्णालयात अद्ययावत वैद्यकीय उपकरणे उपलब्ध करून घेण्यासाठी आवश्यक असणारा सर्व निधी मंजूर करण्यात येईल. वैद्यकीय शिक्षण खात्याने 25 कोटी रुपयांच्या निधीस प्रशासकीय मंजुरी दिल्यानंतर तातडीने याला मान्यता देण्यात येईल.''
""पुढील तीन दिवसांमध्ये प्रशासकीय निधीस मंजुरी देण्यात येईल,'' डॉ. गावित यांनी सांगितले. ते म्हणाले, ""वैद्यकीय पदवीच्या जागा दोनशेवरून अडीचशे, तर पदव्युत्तर पदवीच्या जागाही त्याप्रमाणात वाढविणार आहे. सध्या फक्त एका "सुपर स्पेशालिटी'चा एक विभाग आहे. येत्या वर्षभरात सहा विभागात "सुपर स्पेशालिटी'चे शिक्षण सुरू करणार आहे.''
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. कल्पना कुलकर्णी यांनी केले. उपअधिष्ठाता डॉ. रेणू भारद्वाज यांनी आभार मानले.
पाणी आणि वीज दोन्ही महत्त्वाचे
"इतर ठिकाणासारखी नुसते भाषण येथे करू नका, तर प्रत्यक्ष निधी मंजूर करा,'' असे तटकरे आणि डॉ. गावित यांच्याकडे पाहून पवार म्हणाले. त्यानंतर ते लगेचच म्हणाले, ""ससूनसाठी मदत केल्यास रायगड आणि नंदुरबार येथील वीज आणि पाण्याची कामे लवकर होतील. पाणी आणि वीज दोन्ही सर्वांसाठी महत्त्वाचे आहे,'' असे म्हटल्यावर सभागृहात हास्याची एक लाट उठली.