सकाळ वृत्तसेवा
२२ मार्च २०१०
पुणे, भारत
वैद्यकीय उपचारांचा खर्च वाढला असून, सर्वसामान्यांना परवडेल अशा दरात उपचार उपलब्ध झाले पाहिजेत, अशी अपेक्षा केंद्रीय मंत्रिमंडळाचे माजी सचिव बी. जी. देशमुख यांनी येथे व्यक्त केली.
जनसेवा फाउंडेशन, पुणे विद्यापीठ आदी संस्थांतर्फे जागतिक आरोग्य संघटनेचे माजी संचालक डॉ. गुरुराज मुतालिक यांचा 81 व्या वाढदिवसानिमित्त सत्कार करण्यात आला. या वेळी देशमुख अध्यक्षस्थानी होते. डॉ. ह. वि. सरदेसाई, डॉ. के. एच. संचेती, डॉ. शरच्चंद्र गोखले, डॉ. सुभाष साळुंखे, डॉ. शिवाजीराव कदम, डॉ. विनोद शहा, डॉ. दिलीप सारडा, प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक जब्बार पटेल, अभिनेते मोहन आगाशे आदी उपस्थित होते. डॉ. मुतालिक यांना त्यांच्या विद्यार्थ्यांतर्फे देशमुख, सरदेसाई यांच्या हस्ते मानपत्र, पुणेरी पगडी देऊन सन्मानित करण्यात आले.
या वेळी उपस्थितांनी डॉ. मुतालिक यांच्या कार्याचा गौरव आपल्या मनोगतात केला. देशमुख म्हणाले, डॉ. मुतालिक यांनी विद्यार्थ्यांना केवळ शिक्षण दिले नाही, तर चांगले डॉक्टर घडविले. तर डॉ. मुतालिक यांचे व्यक्तिमत्त्व प्रतिभावंत, प्रज्ञावंत असल्याचे सरदेसाई यांनी नमूद केले. डॉ. मुतालिक यांनी त्यांचे पुढील आयुष्यही दुसऱ्यांना ज्ञान देण्यातच खर्ची करावे, अशा शुभेच्छाही त्यांनी दिल्या. ससून रुग्णालयाच्या प्रगतीत डॉ. मुतालिक यांचा मोठा हातभार असल्याचे नमूद करीत डॉ. संचेती यांनी, विद्यार्थी काळापासून डॉक्टर झाल्यानंतरही डॉ. मुतालिक यांनी केलेल्या मदतीची माहिती दिली. माझ्या विद्यार्थी काळात डॉ. मुतालिक यांनी शिक्षक म्हणून माझी बेशिस्त समजून घेतली, नाटकाच्या प्रयोगातून वेळ मिळाला तर कधी कधी अभ्यास करीत जा, असा सल्लाही दिला, अशी आठवण जब्बार पटेल यांनी सांगितली.
उपस्थितांच्या मनोगतानंतर डॉ. सुभाष साळुंखे आणि अभिनेते मोहन आगाशे यांनी डॉ. मुतालिक यांची मुलाखत घेतली. यात त्यांनी आपली वाटचाल मांडली आणि आपल्या क्षमतेपेक्षा अधिक करण्याचा प्रयत्न सर्वांनी करावा, असे आवाहनही डॉ. मुतालिक यांनी केले.
सर्वसामान्यांना परवडणाऱ्या दरात उपचार उपलब्ध व्हावेत - बी. जी. देशमुख
- Details
- Hits: 3198
0