सकाळ वृत्तसेवा
२१ जुन २०१०
शर्मिला कलगुटकर
मुंबई, भारत
भारतातील सतराहून अधिक प्रख्यात रुग्णालयांमध्ये सतरा वर्षांहून अधिक काळ रक्तात मुरलेली कावीळ बरी व्हावी यासाठी फिरत असणाऱ्या बिहारमधील चैनपूर या गावातील मनीषकुमार सिंह या पंचवीस वर्षीय तरुणाला शीव येथील लोकमान्य टिळक रुग्णालयातील शल्यविशारदांनी अक्षरशः मृत्यूच्या जबड्यातून बाहेर खेचून काढले. अत्यल्प खर्चामध्ये केलेल्या या शस्त्रक्रियेने या उमद्या तरुणास जीवदान मिळाले असून तो पुन्हा आपल्या गावी परतला आहे.
पालिका रुग्णालयामध्ये असणाऱ्या दूरवस्थेबाबत अनेकदा टीकेची झोड उठवली जाते, मात्र कर्मचाऱ्यांनी संप पुकारलेल्या दिवशी प्रशिक्षणार्थी डॉक्टर विद्यार्थ्यांना मदतीस घेऊन डॉ. संध्या अय्यर, डॉ. उषा घाग यांसारख्या सर्जरी विभागातल्या डॉक्टरांनी ही अत्यंत कठीण शस्त्रक्रिया लीलया पार पाडली आणि अवघ्या महिनाभराच्या अवधीत मनीषकुमारला पूर्ववत बरे केले. लोकमान्य टिळक रुग्णालयामध्ये तीन वर्षांपासून ऍडव्हान्स लेप्रोस्कोपी विभाग सुरू झाला आहे. या विभागामध्ये अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि किरणांचा वापर करून दुर्बिणीच्या साह्याने अनेक जटील शस्त्रक्रिया केल्या जातात. मात्र त्याचा पुरेसा प्रचार न झाल्याची खंत डॉ. संध्या अय्यर यांनी "सकाळ'कडे व्यक्त केली. मनीषकुमारही देशातल्या अनेक खासगी आणि सार्वजनिक रुग्णालयांमध्ये फिरून थकला होता. प्रत्येक ठिकाणी रक्तामध्ये मुरलेली ही कावीळ बरी होऊ शकणार नाही, असेच मत तज्ज्ञ डॉक्टरांनी व्यक्त केले होते. मात्र शीव रुग्णालयामध्ये त्याच्या रक्तामधील लाल रक्तपेशींच्या निर्मितीमध्ये असणारा दोष दिसून आला, त्यांच्या गुठळ्या होऊन त्या इतर रक्तपेशींच्याही वाढीस प्रतिबंध करीत असत. हिनोलेटिक ऍनेमिया या प्रकारामध्ये मोडणाऱ्या या व्याधीमध्ये पित्ताशयाच्या पिशवीमध्येही खडे निर्माण झाले होते. त्यामुळे त्याच्या अन्ननलिका आणि श्वसनमार्गामध्येही व्यत्यय येत होता.
अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमाचा वापर करून केलेल्या दुर्बीण शस्त्रक्रियेमध्ये मनीषच्या पोटावर तीन ठिकाणी छोटे छेद देऊन आतड्यामधील प्लिहा काढून टाकण्यात आली. त्यामुळे रक्तात वाढ होणाऱ्या बीलरुबीन या तंतूपेशींची वाढही आटोक्यात आली व रक्तनिर्मिती प्रक्रिया सुरळीत सुरू झाली. या उपचारासाठी खासगी रुग्णालयामध्ये लाखो रुपये मोजावे लागले असते, मात्र शीव रुग्णालयात ही शस्त्रक्रिया अवघ्या औषधांचा खर्च घेऊन करण्यात आली. सतरा वर्षांपासून मनीषची नखे व डोळे पिवळ्या रंगाचे दिसत असत, त्याला इतर कुठलाही त्रास होत नसला तरीही मागील वर्षभरापासून त्याच्या पोटात खूप दुखू लागले होते. ही कावीळ असल्याचे निदान झाल्यानंतर त्याने मागील काही वर्षांमध्ये विविध आयुर्वेदिक औषधे घेतली, पण त्याचा कोणताही लाभ झाला नाही. आज अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून दुर्बिणीतून शस्त्रक्रिया करणे हे आव्हानात्मक असले तरीही रुग्णास असलेल्या व्याधीतून पूर्णपणे बरी करण्याची शाश्वती देते. मुंबईमध्ये सार्वजनिक रुग्णालयांत केवळ केईएम आणि लोकमान्य टिळक रुग्णालयांतच ही सुविधा उपलब्ध आहे. या शस्त्रक्रियेच्या माध्यमातून कर्करोगावरही मात करता येते, असा विश्वास शस्त्रक्रिया विभागाच्या प्रमुख डॉ. संध्या अय्यर यांनी व्यक्त केला. मूत्रपिंडाचा, मोठ्या आतड्याचा, जठराचा, स्वादुपिंडाच्या कर्करोगाचे निदान झाल्यावर ही शस्त्रक्रिया अत्यंत प्रभावशाली ठरते, अशीही माहिती त्या देतात. दुर्दैवाने टिळक रुग्णालयामध्ये या अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला जातो, याची सर्वसामान्यांना अद्याप माहिती नसल्यामुळे अन्य कर्करोग केंद्रामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात रुग्णांची रीघ लागलेली असते. या व्याधींच्या उपचारांसाठी सर्वसामान्य तसेच गोरगरीब रुग्णांनी पुढे यावे, असे आवाहनही करण्यात येत आहे.